ठाकरे गट शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याची हवा काढणार? करणार अवकाळी ग्रस्त भागाची पाहणी
अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या सहकारी मंत्री आणि आमदार, खासदारांना सोबत घेत अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत
मुंबई : राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. तर अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या सहकारी मंत्री आणि आमदार, खासदारांना सोबत घेत अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखिल आपल्या भाजपच्या नेत्यांसह गेले आहेत. त्यावरून विरोधक आता टीका करत आहेत. याचवेळी उद्धव ठाकरे गटाने शिंदे यांना घेरत त्यांच्या अयोध्या दौऱ्यातील हवा काढण्याची तयारी केली आहे. ठाकरे गटाकडून अवकाली ग्रस्त भागात दौरे काढण्यात येणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यात सहभागी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा दौरा मराठवाडा, विदर्भ, आणि उत्तर महाराष्ट्रात काढण्यात येणार आहे. तर शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर यातून देण्यात येणार आहे.