Video | ..तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवू, अंतरवालीच्या सभेत मनोज जरांगे यांचा निर्धार

Video | ..तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवू, अंतरवालीच्या सभेत मनोज जरांगे यांचा निर्धार

| Updated on: Jan 28, 2024 | 4:05 PM

मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांसाठी गेली पाच ते सहा महीने उपोषण आणि मोर्चे काढून महाराष्ट्रातील राजकारणाला हादरा दिला. मराठ्यांना सरसकट आरक्षण घेऊनच परतणार अशी गर्जना करीत जरांगे पाटील यांनी 20 जानेवारी रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने कूच केले. परंतू नवीमुंबईत हे आंदोलन थोपविण्यात सरकारला यश आले. सरकारने जरांगे यांची सगेसोयरे बाबतच्या मागणीसाठी अध्यादेश जारी केल्याने जरांगे पाटील मुंबईला न जाता माघारी फिरले. परंतू आता जरांगे यांनी पुन्हा नवीन अट टाकत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे म्हटले आहे.

जालना | 28 जानेवारी 2024 : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. त्यांच्या मागणीनूसार राज्य सरकारने सगेसोयरेबाबत अध्यादेश काढला आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी ‘चलो मुंबई’ आंदोलन मागे घेत पुन्हा अंतरवाली सराटी गाठली आहे. सगे सोयऱ्यांना देखील आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाची उद्यापर्यंत अंमलबजावणी करावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला केली आहे. कुणबी नोंद असलेल्याच्या सगेसोयऱ्यांना शपथपत्र दाखल केल्यानंतर एक तरी प्रमाणपत्र मिळायला हवे, तोपर्यंत आपले आंदोलन सुरुच राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. राजपत्राचा कायदा पास झाला आणि त्याचा फायदाच झाला नाही तर काय उपयोग ? त्यामुळे एक टक्का लोकांना तरी प्रमाणपत्र त्या अध्यादेशामुळे मिळायला हवे असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच येत्या 30 जानेवारी रोजी रायगडला जाऊन आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेणार असून लवकरच मार्ग जाहीर करू असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Published on: Jan 28, 2024 04:04 PM