Beed | बीड दौऱ्यादरम्यान खासदार संभाजीराजे भडकले!
संभाजीराजे व्यासपीठावर असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. त्यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनीही आपला रुद्रावतार दाखवला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तुम्हाला मला जाब विचारायचा असेल तर आधी मला मुख्यंमंत्रीपदावर बसवा, असे वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. बीड दौऱ्यावर असलेल्या संभाजीराजे यांचा शुक्रवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी प्रवेश केला. संभाजीराजे व्यासपीठावर असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरु केली.
त्यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनीही आपला रुद्रावतार दाखवला. त्यांनी उलट संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर शाब्दिक हल्ला केला. तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर आजी-माजी मुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना विचारा. मात्र, त्यांच्याकडून तुम्हाला उत्तर मिळणार नाही. मला प्रश्न विचारायचे असतील तर प्रथम मला मुख्यमंत्री करा, असे संभाजीराजे यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. मात्र, यानिमित्ताने संभाजीराजे यांच्या मनातील मुख्यमंत्रीपदाची इच्छा ओठावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. आता या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात काय पडसाद उमटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.