“आता खरी गोची एकनाथ शिंदे यांची”, अजित पवार यांच्या बंडानंतर ठाकरे गटाची टीका
अजित पवार भाजपसोबत आल्याने शिंदे गट अडचणीत सापडला आहे. अजित पवार निधी देत नाहीत, म्हणून आम्ही बंडखोरी केली असा दावा शिंदे गटाने केला होता. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
रत्नागिरी: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या 30 आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र आता अजित पवार भाजपसोबत आल्याने शिंदे गट अडचणीत सापडला आहे. अजित पवार निधी देत नाहीत, म्हणून आम्ही बंडखोरी केली, असा दावा शिंदे गटाने बंडावेळी केला होता. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. “अजित पवार भाजपसोबत गेल्याने खरी गोची एकनाथ शिंदे यांची झाली आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कंटाळून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं ते एकनाथ शिंदे आता अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून तीन चाकी सरकार चालवणार का ? एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेले आरोप खोटे होते हे सिद्ध झालं आहे. त्यांना जनाची नाही तर मनाची लाज असेल तर त्या आरोपांबाबत माफी मागावी,” असं राऊत म्हणाले.