अमरावतीसह विदर्भात अवकाळी पावसानंतर उन्हाचा तडाखा! पारा गेला 40 शी पार
विदर्भात मे महिन्यात सर्वाधिक तापमान असते. त्यामुळं आता तापमान 45 अंशावर जाण्याचा इशारा हवामान खात्यानं व्यक्त केला असतानाच आता अमरावतीसह विदर्भात सुर्य आग ओकत आहे.
अमरावती : विदर्भात एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीला पावसाने झोडपल्यानंतर आता मात्र खऱ्या उन्हाळ्याला सुरुवात झालीय. विदर्भात मे महिन्यात सर्वाधिक तापमान असते. त्यामुळं आता तापमान 45 अंशावर जाण्याचा इशारा हवामान खात्यानं व्यक्त केला असतानाच आता अमरावतीसह विदर्भात सुर्य आग ओकत आहे. यंदा एप्रिल महिन्याच्या मध्यात विदर्भाचं तापमान 43 अंशावर गेलं होतं. पण अचानक वातावरणात बदल होऊन अवकाळी पाऊस सुरू झाला. काही दिवस उन्हाच्या चटक्यांपासून नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा एकदा मागील दोन दिवसापासून संपूर्ण विदर्भासह अमरावती जिल्ह्यात सूर्य आग ओकायला लागला आहे. काल अमरावती शहरात तापमान 42.9 डिग्रीवर पोहचलं होतं. तर आज पारा 43 डिग्रीवर जाण्याची शक्यता आहे. मार्च व एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला होता, मात्र मे महिन्यात पारा उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन अमरावतीचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी केले आहे