सरकारी कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या लाडक्या बहीणींचे अर्ज बाद?, काय म्हणाल्या सुप्रिया सुळे
लाडक्या बहिणींनी जर सरकारच्या कार्यक्रमात हजेरी लावली नाही तर त्यांचे अर्ज बाद करणार असा संदेश व्हायरल झाला असून हिंमत असेल तर सरकारने एक तरी अर्ज बाद करुन दाखवावाच असे आव्हान खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला दिले आहे.
मुख्यमंत्री बहिण माझी लाडकी या योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यावर थेट दोन हप्ते जमा होऊ लागले असताना आता राज्य सरकारने या योजनेचा राजकीय लाभ मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. एकीकडे रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेबाबत आशीवार्द द्या नाही तर पैसे परत घेऊ अशी धमकी वजा इशारा दिला होता. त्यानंतर आपण ते मजेत म्हणाल्याची सारवासारव राणा यांनी केली होती. जर या योजनेत सरकारी कार्यक्रमांना हजर राहीले नाही तर तुमचा अर्ज बाद केला जाईल असा व्हायरल संदेश समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. या संदेशाचा हवाला देत आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करीत राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत. एक तरी अर्ज बाद करुन दाखवाच असा इशारा देखील सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. तर या प्रकरणात राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते सुनील तटकरे यांनी हा खोटा आरोप असल्याचा दावा करीत असे कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. काही तरी खोटं नॅरेटिव्ह सेट करण्याचा सुळे यांचा प्रयत्न असल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे.