पक्षाचे तरुण जो काही निर्णय घेतील, त्या दिशेने जावेच लागते ? छगन भुजबळ यांचे प्रतिपादन
राष्ट्रवादी पक्षाच्या जन्मापासून आपण तेथे होतो, पक्षाचे चिन्ह आणि झेंडा माझ्या बंगल्यात ठरविला गेला. सुदैवाने त्यात आमचा सिंहाचा वाटा होता. जे आमचे होते ते आम्हाला मिळाले तर कुणाला वाईट वाटण्याची गरजच काय असा सवाल राष्ट्रवादी पक्षाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
पुणे | 11 जानेवारी 2024 : आज तरुणांचा जमाना आहे. राजकारणात पक्षाचे तरुण जे निर्णय घेतात त्याच्या मागे जावे लागते, लोकशाहीत बहुमताला महत्व आहे. त्यामुळे शरद पवारांनी आणि त्यांच्या सोबत असलेल्यांनी पुनर्विचार केला पाहीजे..नाही तर किमान थांबायला तरी हवे. मी पण राष्ट्रवादी पक्षाच्या जन्मापासून पक्षात होतो. पक्षाचे चिन्ह आणि झेंडा मिळविताना सुदैवाने माझा सिंहाचा वाटा होता असे राष्ट्रवादी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी पुणे येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात म्हटले आहे. विरोधी पक्ष नेते म्हणून माझा सरकारचा ए – 10 बंगल्यात समीर आणि पंकज यांनी पक्षांचे चिन्ह बनविले. त्यामुळे कोणाला वाईट वाटण्याची गरज काय असेही भुजबळ यांनी म्हटले. पक्षाला तरुणांची गरज असते, परंतू ते स्वयंस्फूर्तीने आलेले कार्यकर्ते हवेत, पगारी नको. आज येथे अजित पवारांकडे स्वयंस्फूर्तीने लोक आले आहेत. कर्जत-जामखेडचे नेते स्वत:ला तरुणांचे नेते म्हणवत आहेत, परंतू त्यांच्या अवतीभवती पगारी कार्यकर्ते असल्याची टीकाही भुजबळ यांनी केली आहे.