राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कोण ? ‘या’ तीन नेत्यामंध्ये दावेदारीची स्पर्धा
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ गटनेता अजित पवार आणि त्यापाठोपाठ खासदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या तिन्ही नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागल्याने पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ गटनेता अजित पवार आणि त्यापाठोपाठ खासदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या तिन्ही नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागल्याने पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. मात्र, यावर बोलताना अजित पवार यांनी खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे. ज्या पक्षाला सर्वात जास्त बहुमत मिळते. ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून येतात. त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो. पण, सध्या तरी तशी परिस्थिती नाही. कुणी उत्साही कार्यकर्त्यांनी हा बॅनर लावला माहित नाही. एकाने फोटो लावला की दुसऱ्याचा उत्साह ओसंडून जातो असे ते म्हणाले. तर सुप्रिया सुळे यांनी त्या पोस्टरवर अजित दादा आणि माझा फोटो लावला असला तरी आमच्या त्या बॅनरवर कुणाचे नाव नाही. अशी कोणालाही परवानगी दिलेली नाही. असे बॅनरवर फोटो लावणाऱ्यांवर मुंबई पोलिसांनी कारवाई करायला हवी असे त्यांनी स्पष्ट केले.