Special Report | नोएडातले ट्विन टॉवर्स का आणि कसे पाडले?
हे ट्विन टॉवर्स पाडण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून तयारी करण्यात आली होती. एडिफाय इंजिनीअरिंगला ट्विन टॉवर्स पाडण्याचं काम देण्यात आलं होतं. यासाठी गेल्या आठवडाभरापासून 46 जणांची टीम दिवसरात्र काम करत होती. परिसरातल्या 5 हजार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं होतं. धुळीपासून बचाव व्हावा यासाठी शेजारच्या इमारती झाकण्यात आल्या होत्या. इमारत पाडण्यासाठी तब्बल 3 हजार 700 किलो स्फोटकांचा वापर करण्यात आलाय
नवी दिल्ली : 300 कोटी खर्चून बांधलेले नोएडातले( Noida) हे ट्विन टॉवर्स( twin towers) अवघ्या 12 सेकंदात जमीनदोस्त झाले. एपेक्स आणि सेयान नावाचे हे 32 मजली टॉवर्स आज अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं पाडण्यात आले. 2 टॉवर्स पाडल्यानंतर शेकडो मीटरपर्यंत धूळ पसरली. जवळपास 30 मीटर उंचीपर्यंत याचा ढिगारा तयार झाला. पण नोएडातले हे ट्विन टॉवर्स का पाडले तेही जाणून घ्या. 2005 साली ‘सुपरटेक’ कंपनीला 9 मजल्यांचे 14 टॉवर्स बांधण्याची परवानगी देण्यात आली होती. यात शॉपिंग कॉम्प्लेक्सचाही समावेश होता. 2009 मध्ये या प्रकल्पात सुधारणा करत ‘एपेक्स’ आणि ‘सेयान’ हे दोन भव्य टॉवर्स बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठीच्या नवीन आराखड्याला नोएडा प्राधिकरणाकडून परवानगी देण्यात आली होती. पण 2012 साली अनधिकृत बांधकामाचा आरोप करत या प्रकल्पाविरोधात खरेदीदारांची संघटना न्यायालयात गेली. 2014 साली अलाहाबाद उच्च न्यायालयानं हे बांधकाम अनधिकृत ठरवलं. या निकालाविरोधात ‘सुपरटेक’ कंपनी आणि नोएडा प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयाचाही दरवाजा ठोठावला. मात्र सर्वोच्च न्यायालयानंही अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. इमारतीचे नियम आणि अग्निसुरक्षा धाब्यावर बसवून हे टॉवर्स बांधण्यात आल्याचा ठपका सर्वोच्च न्यायालयानं ठेवला होता. हे ट्विन टॉवर्स पाडण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून तयारी करण्यात आली होती. एडिफाय इंजिनीअरिंगला ट्विन टॉवर्स पाडण्याचं काम देण्यात आलं होतं. यासाठी गेल्या आठवडाभरापासून 46 जणांची टीम दिवसरात्र काम करत होती. परिसरातल्या 5 हजार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं होतं. धुळीपासून बचाव व्हावा यासाठी शेजारच्या इमारती झाकण्यात आल्या होत्या. इमारत पाडण्यासाठी तब्बल 3 हजार 700 किलो स्फोटकांचा वापर करण्यात आलाय. इमारत पाडल्यानंतर परिसरातल्या नागरिकांनी स्वागत केलंय. दिल्लीतल्या कुतुबमिनारपेक्षाही जास्त उंची असलेले हे दोन्ही टॉवर्स अवघ्या काही सेकंदात पाडण्यात आले. भारतात एवढी मोठी इमारत पाडण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. अनधिकृत बांधकामांना थारा नाही हे प्रशासन आणि कोर्टानं दाखवून दिलंय. नोएडातले ट्विन टॉवर्स पडल्यानं भविष्यात अनधिकृत बांधकामांना चाप बसण्याची आशा आहे.