श्रीकांत शिंदे कल्याणमधून की ठाण्यातून नशीब आजमवणार ? टीव्ही 9 मराठी स्पेशल रिपोर्ट
लोकसभेच्या निवडणूका केव्हाही जाहीर होऊ शकतात. जागा वाटपात अशावेळी कल्याण आणि ठाण्याची अदलाबदल होण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड असलेल्या ठाणे जिल्ह्यात त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या वाट्याला कल्याण येणार की ठाणे याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मुंबई | 9 मार्च 2024 : शिवसेनेत दोन वर्षांपूर्वी उभी फूट पडल्यानंतर आता लोकसभेच्या कल्याण आणि ठाणे येथील निवडणूकांकडे साऱ्या देशाचे लक्ष लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड असलेल्या ठाणे जिल्ह्यात त्यांचे पूत्र श्रीकांत शिंदे यांची निवडणूक महाराष्ट्रात होणाऱ्या हायप्रोफाईल निवडणूकांपैकी एक ठरणार आहे. मात्र जर जागा वाटपात अदलाबदल झाली तर श्रीकांत शिंदे कल्याण ऐवजी ठाण्यातून निवडणूक लढवू शकतात असे म्हटले जात आहे. जर कल्याणमधून 2019 साली निवडून आलेल्या श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधूनही जर निवडणूक लढवावी लागली तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सुभाष भोईर किंवा सुषमा अंधारे यांना श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. स्वत: श्रीकांत शिंदे यांनी मात्र यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. जर ठाण्यातून श्रीकांत शिंदे यांना निवडणूक लढवावी लागली तर ठाण्यात त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे यांच्याशी लढत द्यावी लागेल. तसे झाले तर टफ फाईट होण्याची शक्यता आहे. राजन विचारे यांनी गेल्या निवडणूकीत सात लाख मतांच्या आघाडीने राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांचा पराभव केला होता. ठाणे आणि कल्याण मतदार संघ कोणाच्या वाटेला येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.