Loksabha Election 2024 : बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना पवार कुटुंबाच्या सुनबाई देणार आव्हान?
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात कोण उमेदवार असणारा याची चर्चा सुरु असतानाच एक मोठी बातमी समोर आलीय. पवार कुटुंबाच्या सुनबाई या सुप्रिया ताई यांना लोकसभा निवडणुकीत आव्हान देणार अशी चर्चा बारामतीमध्ये रंगली आहे.
बारामती | 18 ऑक्टोंबर 2023 : बारामतीच्या खासदार, राष्ट्रवादीच्या नेत्या आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक कोण लढविणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांची साथसोबत सोडली. शिंदे – फडणवीस सरकारमध्ये ते सामील झाले. यामुळे राष्ट्रवादी पक्षात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला. येथून अनेक वर्ष शरद पवार हे खासदार म्हणूण ते अजित पवार हे आमदार म्हणून निवडून आलेत. मात्र, दोन गट पडल्यानंतर आता सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवार देण्याची तयारी अजित पवार गटाकडून करण्यात येत आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती लोकसभा मतदारसंघात बॅनर लागले आहेत. या बॅनरवर सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा देताना संसदेचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे बारामतीमध्ये एकच चर्चा सुरु झाली आहे.