नंदुरबारच्या मिरची व्यापाऱ्याला लागली अवकाळी नजर, तब्बल 5 ते 7 कोटीचे नुकसान
नंदूरबारची कृषी उत्पन्न बाजार समिती मिरची व्यापारासाठी देशात प्रसिद्ध आहे. या मिरचीच्या व्यापाराला देखील अवकाळी पावसाचा जबर फटका बसला आहे. मिरचीचा साठा गेल्या आठवड्यातील अवकाळी पावसाने भिजल्याने व्यापाऱ्यांना पाच ते सात कोटी नुकसान झाले आहे. शिवाय विमा कंपन्यांनी देखील नुकसान भरपाई देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अवकाळीचा फटका शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांनाही बसला आहे.
नंदुरबार | 10 डिसेंबर 2023 : नंदुरबार बाजार समिती मिरच्यांच्या व्यापाऱ्यासाठी महाराष्ट्रातच नाही तर गुजरात आणि मध्य प्रदेशात देखील प्रसिद्ध आहे. गुजरातमधून या मिरच्यांना खूप मोठी मागणी आहे. परंतू अवकाळी पावसाने मिरच्यांच्या व्यापाऱ्याला अक्षरश: नजर लागली म्हणायची. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीकडे मिरच्यांची आवक आल्यानंतर तिच्या साठवणूकीची योग्य यंत्रणा नाही. गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांसह आता व्यापाऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाचा मोठा फटका मिरची व्यापाऱ्यांना बसला असून व्यापाऱ्यांचे पाच ते सात कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समिती मिरच्यांच्या व्यापाऱ्यासाठी खूप प्रसिध्द आहे. शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेशातून येथे मिरची खरेदीसाठी मागणी असते. दिवाळीपासून मिरचीचा नवा हंगाम सुरू होतो असतो. दिवाळीपासून व्यापारी मिरची खरेदीला सुरुवात करतात. रोज 5 क्वींटलपर्यंत आवक या मिरची व्यापाऱ्यांकडे होत होती. परंतू अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाऊस पडला त्यावेळेस 30 ते 40 हजार क्वींटल माल पडलेला होता. परंतु अचानक आलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात मिरची पाण्यामध्ये सापडल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही मिरची भरण्यासाठी वेळ मिळाला नाही आणि जागाही उपलब्ध नसल्यामुळे व्यापाऱ्यांचे जवळपास 50% नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे.
विमा भरपाई देण्यास कंपन्यांचा नकार
एकूण 15 कोटीच्या मालांपैकी 5 ते 7 कोटीचे नुकसान झाले आहे. एवढे मोठे नुकसान झाले असतानाही शासनाकडून कोणीच पंचनामे अथवा चौकशी करायला आलेले नसल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे . दरवर्षी असेच नुकसान होते परंतू सरकारकडून कोणत्याही प्रकराची सुविधा दिली जात नाही. जिल्ह्यातील आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आणि पालकमंत्र्यांनी विधीमंडळ अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून व्यापाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना पिक विमा दिला जातो त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांना सुद्धा विमा देण्यात यावा अशी मागणी होत आहे. यासंदर्भात व्यापाऱ्यांनी पिक विमा कंपन्यांच्या भेटी घेतल्या आहेत. परंतु मिरची व्यापारी हे उघड्यावर मिरची वाळवत असल्याने त्यांना छत नसल्याने विमा कंपनी त्यांना विमा देण्यासाठी नकार दर्शवित आहे. त्यामुळे शासनाने काहीतरी सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी देखील व्यापाऱ्यांकडून होत आहे.