लोकसभा निवडणूक 2024

17व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 रोजी संपणार आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोग 16 जूनपूर्वी सार्वत्रिक निवडणुका घेईल आणि नवीन सरकार स्थापन होईल. देशात लोकसभेच्या 543 जागा आहेत. तर बहुमतासाठी 272 जागा जिंकणे आवश्यक आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 30हून अधिक राजकीय पक्षांशी युती केली आहे. तर विरोधकांनी 28 पक्षांशी आघाडी करून आपल्या आघाडीला ‘इंडिया आघाडी’ असं नाव दिलं आहे. त्यामुळे देशात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीत थेट लढत होणार आहे. मात्र, बसपा, बीजेडी, अकाली दलसारख्या पक्षांनी कोणत्याच आघाडीला पाठिंबा दिलेला नाही.

2019मध्ये देशभरात 11 एप्रिलपासून ते 19 मे दरम्यान सात टप्प्यात निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर झाला होता. 2019मध्ये देशभरात सुमारे 91.2 कोटी मतदार होते. त्यावेळी 67 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार वापरला होता. या निवडणुकीत भाजपला 37.36 टक्के आणि काँग्रेसला 19.49 टक्के मते मिळाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपने लागोपाठ दोनवेळा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला असून आता हॅट्रीक करण्याची तयारी सुरू झाली आहे. तर कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने सुरू केला आहे.

देशात 18 व्या लोकसभेसाठी एप्रिल आणि मे 2024मध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या प्रत्येक सभागृहाचा कार्यकाळ पाच वर्षाचा असतो. पाच वर्षाची मुदत संपण्यापूर्वीच निवडणूक आयोग निवडणुका घेत असतो. संविधान आणि कालमर्यादेचं उल्लंघन होणार नाही, याच हिशोबाने निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा निश्चित केल्या जातात. निवडणुका घोषित झाल्यानंतर 40 ते 45 दिवसानंतर मतदानाची तारीख असते. उमेदवारांना प्रचार करण्यासाठी वेळ मिळावा हा त्यामागचा हेतू असतो. 2014 आणि 2019च्या निवडणुकीच्या तारखा पाहिल्या तर 2024च्या एप्रिल-मेमध्ये निवडणुका व्हायला हव्यात. मार्च ते मेपर्यंतचा काळ हवामानासाठी अधिक चांगला मानला जातो. यंदाच्या निवडणुका पाच ते सात टप्प्यात होतील, असं सांगितलं जातं.