Onion: बाजार समितीच्या एका निर्णयाने कांदा उत्पादकांचा प्रश्न मिटला, आवक सुरुच उलट दरात सुधारणा
कांदा आवकचे सर्व रेकॉर्ड या बाजार समितीने मोडीत काढले आहे. आवक अधिकची झाल्याने महिन्याभरात दोन वेळी बाजार समितीमधील लिलाव हे बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली होती. मात्र, आता कितीही कांद्याची आवक झाली तरी लिलाव हे बंद राहणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
सोलापूर : गेल्या महिन्याभरापासून (Solapur Market Committee) सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची होत असलेल्या आवकचा मुद्दा चांगलाच चर्चेत राहिलेला आहे. असे असताना पुन्हा बुधवारी 880 ट्रकमधून तब्बल 88 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. सध्या आवक होत असलेला कांदा हा खरिपातला असून शेतकऱ्यांकडे साठवणूक करता येत नाही म्हणून छाटणी झाली की विक्री हेच धोरण शेतकरी सध्या घेत आहेत. त्यामुळे (Onion Arrival) कांदा आवकचे सर्व रेकॉर्ड या बाजार समितीने मोडीत काढले आहे. आवक अधिकची झाल्याने महिन्याभरात दोन वेळी बाजार समितीमधील लिलाव हे बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली होती. मात्र, आता कितीही (Onion Auction) कांद्याची आवक झाली तरी लिलाव हे बंद राहणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता मिटलेली आहे. शिवाय लिलाव बंदच्या अनुशंगाने कांदा उत्पादक संघाने बाजार समिती प्रशासनाला याबाबत पत्रही लिहले होते त्याचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे.
एकाच महिन्यात तीन वेळा विक्रमी आवक
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव नंतर सोलापूर ही सर्वात मोठी कांदा विक्रीची बाजारपेठ आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून लासलगावपेक्षाही अधिक कांद्याची उलाढाल ही सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाली आहे. जानेवारी महिन्यात तर तब्बल तीन वेळा 1 लाख क्विंटलहून अधिकची आवक झाली होती. त्यामुळे कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली होती. या आठवड्यातही आवक सुरुच आहे पण 1 लाख क्विंटलच्या खाली आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये मराठवाडा, कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातून आवक होत आहे.
काय होते कांदा उत्पादक संघटनेचे पत्र?
कांद्याचे लिलाव एक-दोन दिवस पुढे ढकलणे म्हणजे शेतकऱ्यांचे नुकसान आहे. सध्या मंडई समितीत येणारा कांदा खरीप हंगामातील लाल कांदा असून या कांद्याची काढणी केल्यानंतर त्याची साठवण क्षमता कमी होऊन शेतकऱ्यांना तो जास्त काळ शेतात ठेवणे शक्य होत नाही, अशी मागणी संघटनेने केली आहे. शिवाय भविष्यात बाजार समिती बंद ठेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांची गैरसोय केली तर आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा पत्राद्वारे देण्यात आला होता.
सर्वसाधरण दर मिळाल्याने शेतकऱ्यांचे समाधान अन् व्यापाऱ्यांची सोय
कांद्याच्या मुख्य बाजार पेठांपेक्षा पाच पटीने आवक ही सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अधिक होत आहे, असे असताना बुधावारी 2 हजार 800 रुपये हा सर्वाधिक दर मिळाला होता तर सर्वसाधरण दर हा 1 हजार 350 एवढा राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्येही समाधान आहे शिवाय यापेक्षा अधिक दर असता तर शेतकऱ्यांचे पैसे अदा करण्यास व्यापाऱ्यांनाही अडचणी निर्माण झाल्या असत्या. त्यामुळे सध्याचे दर हे शेतकऱ्यांसाठी समाधानकारक आणि व्यापाऱ्यांसाठी सोईचे असल्याचे सांगितले जात आहे.
संबंधित बातम्या :
Latur Market : आवक सोयाबीनची चर्चा तुरीची, बाजारातील दरानुसार शेतकऱ्यांची भूमिका..!