पेरले ते उगवले मात्र, पदरात नाही पडले, मुख्य आगारात हळदीचा रंग झाला फिक्कट, कशामुळे निर्माण झाली परस्थिती?
पेरले ते उगवतेच असे असले तरी उत्पादनामध्ये त्याचे रुपांतर झाल्याशिवाय शेतकऱ्यांना त्याचा उपयोग नाही. यंदा तर शेती व्यवसयाची सुत्र ही निसर्गावरच अवलंबून राहिलेली होती. मात्र, या दरम्यान निसर्गाच्या लहरीपणाचाच सामना शेतकऱ्यांना करावा लागलेला आहे. मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यामध्ये हळदीचे उत्पादन घेतले जाते.
नांदेड : पेरले ते उगवतेच असे असले तरी उत्पादनामध्ये त्याचे रुपांतर झाल्याशिवाय शेतकऱ्यांना त्याचा उपयोग नाही. यंदा तर शेती व्यवसयाची सुत्र ही (Nature) निसर्गावरच अवलंबून राहिलेली होती. मात्र, या दरम्यान निसर्गाच्या लहरीपणाचाच सामना शेतकऱ्यांना करावा लागलेला आहे. (Marathwada) मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यामध्ये (Turmeric Production) हळदीचे उत्पादन घेतले जाते. शिवाय वसमतची बाजारपेठही असल्यामुळे दिवसेंदिवस क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. यंदा मात्र, सर्वकाही नुकसानीचे ठरलेले आहे. सततचा पाऊस, बुरशीजन्य रोग आणि ढगाळ वातावरणामुळे लागवड करताना वापरेलेले हळदीचे बेणेसुध्दा निघते का नाही अशी परस्थिती निर्माण झाली आहे. हिंगोलीपाठोपाठ नांदेड जिल्ह्यामध्ये हळदीचे उत्पादन घेतले जाते. पण यंदा 75 टक्के घट झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
कशामुळे ओढावली ही परस्थिती?
हळद पीक ऐन जोमात असताना मराठवाड्यात अतिवृष्टी आणि त्यानंतर ढगाळ वातावरण राहिल्याने या पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे हळद वाढीवर परिणाम झाला होता. अशा स्वरुपाचे वातावरण बऱेच दिवस कायम राहिले होते. त्यामुळे पानावर ठिबके पडले आणि दोन्ही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा हळदीवर झाला होता. शिवाय कंधमाशीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे हळदीचे कंधच पुस होत गेले. थेट कंधावरच परिणाम झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना न केल्यामुळे ही परस्थिती ओढावली असल्याचे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्र तज्ञ डॉ.डी.डी. पटाईत यांनी सांगितले आहे.
उत्पादनात घट, दरामध्ये वाढ
मागणीपेक्षा पुरवठा कमी झाला तर त्याचे दर वाढणार हे बाजारपेठेचे सुत्रच आहे. यंदा तर हंगामाच्या सुरवातीलाच हळदीची आवक कमी होत आहे. सध्या 8 ते 9 हजार रुपये क्विंटल हळदीला दर आहे. मात्र, उत्पादनातच घट झाल्याने आवक कमी होत आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे मराठवाड्यातील मुख्य बाजारपेठ आहे. सध्या जुन्या हळदीचीच आवक सुरु आहे. नव्या हळदीलाही भाव आहे मात्र, त्या प्रमाणात आवकच होत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. दरवर्षी एकरी 30 ते 40 क्विंटलचे उत्पादन असते यंदा मात्र, 5 ते 6 क्विंटल उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडत आहे.
मराठवाड्यातील हळद लागवडीचे चित्र
मराठवाड्यातील केवळ नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्येच हळदीचे अधिकचे उत्पादन घेतले जाते. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील बाजारपेठेचा फायदा परभणी आणि नांदेड येथील शेतकऱ्यांना होत आहे. हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक 27 हजार हेक्टर तर नांदेड जिल्ह्यामध्ये 25 हजार व परभणीमध्ये 2 हजार 400 हेक्टरावर लागवड करण्यात आली आहे. मराठवाड्यातील हळदीला हैदराबाद, आंध्र प्रदेश येथून मागणी आहे. सौदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी या हळदीचा वापर केला जात आहे.
संबंधित बातम्या :
सुविधांपेक्षा अडचणी अधिक : हमीभाव केंद्रावरच नाही पैशाची हमी, शेतकरी सावकाराच्या दारात
अमरावती जिल्ह्यात शेतक-यांच्या मृत्यूचे सत्र सुरूचं, गेल्यावर्षी 361 आत्महत्या, आकडेवारी जाहीर