लातूर : वातावरणातील बदल, निसर्गाचा लहरीपणा आणि शेती व्यवसयातील वाढत चाललेल्या अडचणी यामुळे उत्पादन वाढीसाठी नवा पर्याय शोधणे ही काळाची गरज झाली आहे. मात्र, आजही शेतीला (farmer linkages) जोडव्यवसाय म्हणलं की पशूपालन याकडेच लक्ष केंद्रीत होते. पण ( Nursery) रोपवाटिका एक असा पर्याय आहे की, ज्यामधून उत्पन्नात तर वाढ होणारच आहे पण शेतकऱ्याची स्वत:ची गरजही भागणार आहे.
त्यामुळे बदलत्या काळाच्या ओघात आणि अनेकांची गरज लक्षात घेता रोपवाटिका हा नवा पर्याय समोर येत आहे. पण यासाठी हवे योग्य नियोजन. पुर्वी बियाणे वापरून शेतकरी रोपे तयार करीत असत पण त्यामध्ये त्याचा खूप वेळ व कष्ट लागत तंत्रज्ञान माहित नसल्यामुळे खुप नुकसान होत असत. त्यामुळे रोपवाटिकेचे नियोजन कसे करावे याची माहिती आपण घेणार आहोत.
नर्सरी करण्याआधी कोणत्या भागात कोणते पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते, कोणत्या प्रकारची फळझाडे व भाजीपाला पिके आहेत याचा विचार करून नर्सरीची उभारणी करायला हवी . उदा, कोकणात – आंबे , नारळ , सुपारी, काजु, कोकम यांच्या रोपवाटिका पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रात- मोसंबी, लिंबू , बोरी, डाळिंब, केळी विदर्भात – संत्रा, मराठवाड्यात – संत्रा , मोसंबी, खानदेशात – केळी असे त्या-त्या भागात त्या – त्या जातीच्या फळांच्या रोपवाटिका असल्या म्हणजे वाहतुकीचा साठवणीचा खर्चही कमी होतो .
एक चांगले शेड हाऊस किंवा ग्रिन हाऊस उभारून त्याला चांगल्या प्रकारच्या मिडिया वापरून काळ्या प्लॅस्टिकच्या ट्रे मध्ये बियाणांचे उगवण करावे लागणार आहे. ग्रीन हाऊस व शेड हाऊस मध्ये बियाणांची उगवण शक्ती जास्त असते. यामध्ये वायु जीवन नियंत्रित करता येत असल्यामुळे रोपांची वाढ चांगली व निरोगी होते. गादी वाफ्यावर कलम किंवा बियाणे उगवण्यासाठी टाकल्यास माती मधील जीवाणू व रोग त्यावर येऊ शकतात त्यामुळे नंतर उत्पादन कमी येऊ शकते. म्हणून कोकोपिठ वापरून ‘ट्रे’ मध्येच रोप किंवा कलमे तयार करणे गरजेचे आहे.
नर्सरीमध्ये पाण्याची मुबलक व्यवस्था असायला हवी. उच्च तंत्रज्ञानावर आधारित नर्सरीमध्ये ग्रीन हाऊस हवेच यामध्ये हवामानाचे नियंत्रण करता येते. ग्रीन हाऊस उभारताना त्यात हवा खेळती राहील याची काळजी घेतली पाहिजे. ग्रीन हाऊसमुळे सुर्यकिरणांच्या तीव्रतेचे नियंत्रण करता येते. अतिनिल किरणांच्या प्रतिबंध करता येतो. ग्रीन हाऊस उभारताना आपल्याला किती आवश्यकता आहे हे पाहून परिसर ठरवावा लागणार आहे. ग्रीन हाऊसमध्ये हवामान नियंत्रण करणासाठी अतिसुक्ष्म तुषार पद्धत व त्याचे रोपानुसार नियंत्रण करणारे तंत्रज्ञान असावे.
एकदा रोपे तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांकडे व्यवस्थित पोहचतील अशी व्यवस्था करणे आवश्यक आहे, कारण वाहतूकीच्या दरम्यान रोपांना हानी होऊ शकते. रोपे विक्रीनंतर शेतकऱ्यांना सेवा दिलीच पाहिजे. याबरोबच शेतकऱ्याने ती कशी लावायची, खतांचे नियोजन करायचे कसे, शिवाय पाण्याचे नियोजन इ. सर्व गोष्टींची माहिती वेळोवेळी शेतकऱ्यांना दिली तर त्याच्या उत्पादन वाढ होऊन रोपवाटिका नव्यारुपाला येते.