नंदुरबारच्या महिला शेतकऱ्यांची यशोगाथा! ‘मशरूम’ने उंचावली मान
Mushrooms Farming Nandurbar : स्टार्टअप्सच्या युगात आता शेतकरी सुद्धा मागे नाहीत. कृषीवर आधारीत उद्योगामध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. नंदुरबारमध्ये तर महिला शेतकरी कृषीपुरक उद्योगात आगेकूच करत आहेत. मशरूम शेतीने त्यांची मान उंचावली आहे.

नंदूरबार जिल्ह्यात स्थलांतरासाठी ओळखल्या जातो. मात्र कृषी विभागाच्या मदतीने महिला बचत गटाने रोजगार शोधून काढला आहे. २५ महिला मिळून मशरूम शेती करत आहे. शेतीला पर्यायी जोडधंदा म्हणून मशरूम शेतीचे उत्पन्न घेण्यात येत आहे. या महिलांना साथ लाभली ती कृषी विभागाची. कृषी विभागाने प्रशिक्षण देऊन या महिलांना प्रोत्साहन दिलं आणि यशस्वी मशरूम शेती करून दाखवली. या मशरूमने त्यांची मान उंचावली आहे.
रोजगारासाठी गुजरातकडे धाव
नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याच्या सीमेवर असल्याने जिल्ह्यात रोजगार नसल्यामुळे हजारोच्या संख्येने महिला आणि पुरुष रोजगाराच्या शोधात गुजरात राज्यात जात असतात मात्र स्थलांतर थांबवण्यासाठी प्रशासनासमोर एक मोठं आव्हान उभं राहिले. स्थलांतर कमी करण्यासाठी आता कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. नवापूर तालुक्यातील २५ महिला शेतकऱ्यांना मशरुम प्रशिक्षण देण्यात आले होते.




या प्रशिक्षणात मशरुम शेतीचे प्रात्यक्षिकासोबतच त्यांना बियाणे आणि औषध पुरवठा देखील करण्यात आला होता. याचे फलित आता दिसून येत आहे. ज्या महिलांना हे प्रशिक्षण घेतले त्यांनी आता घरच्या घरी शेतीला पूरक उद्योग म्हणून मशरुम उत्पादन घेत एक वेगळी भरारी घेतली आहे. नवापूर तालूक्यातील एखट्या बोकळझर गावात १२ महिला सध्या मशरुमचे उत्पादन घेत आहे. यातून मिळणाऱ्या नफ्यामुळे त्यांना आकाश ठेंगणे झाले आहे.
सुरत बाजारपेठेमुळे चांगला भाव
नवापुर तालुक्याला लागूनच असलेल्या सुरत बाजारपेठेत मशरुमला असलेली मोठी मागणी आणि त्याला मिळणार भाव यामुळेच या मशरुमची हातोहात विक्री होत आहे. अवघे 300 रुपये किलो बियाणे असणाऱ्या मशरुम उत्पादनातून किलो मागे या मशरुम उत्पादक महिलांना 1200 ते 1500 रुपये मिळत असल्याने फायदाही होत आहे. त्यातच घरातील कोपऱ्यात शेतातल्या पाला पाचोळ्याच्या माध्यमातून होणारे हे मशरुम उद्योग स्थानिकांना नवी भरारी देणारा ठरत आहे. त्यामुळे आगामी काळात नवापूर तालुक्यातील आणखीन शंभर आदिवासी महिला शेतकऱ्यांना याच प्रशिक्षण देऊन वेळ प्रसंगी आयुर्वेदिक औषधी तयार करणाऱ्या कंपन्यांबाबत करार करून या मशरुमची विक्री करण्याचा कृषी विभागाचा मानस आहे.
स्थलांतरासारख्या आणि शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आणल्या जाणाऱ्या अनेक योजनांमधील ही मशरुम शेतीची योजना सध्या नवापूर सारख्या तालुक्यात चांगलीच नावा रुपाला आली आहे. त्यामुळे गुजरातच्या सूरतनजीक असलेला हा नवापूर तालुका आगामी काळात मशरुम हब म्हणून ओळखल्या जावू लागला तर आश्चर्य वाटायला नको.