Onion Rate : कांदा उत्पादकांनो वेळ बदलतेय, पावसाळ्याच्या तोंडावर मिटणार का दराचा वांदा..!
उन्हाळी हंगामात कांद्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने गेल्या दोन महिन्यापासून कांद्याची आवक ही सुरुच होती. शिवाय उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांकडे मुबलक पाणीसाठा आणि पोषक वातावरण यामुळे उत्पादनही भरघोस मिळाले. मात्र, बाजारपेठेत मागणीच नसल्याने कांद्याच्या दरात दिवसेंदिवस घटच होत गेली. अनेकांनी तर रोष व्यक्त करीत कांदा फुकटात वाटप केला तर कोणी कांदा पिकातच रोटर घालून इतर पिकांसाठी क्षेत्र रिकामे केले. मात्र, आता पावसामुळे आवक घटू लागली आहे.
पुणे : गेल्या तीन महिन्यापासून कांद्याचा विषय जरी निघाला तरी दरात घसरणच झाली असणार असे चित्र आहे. यंदा प्रथमच (Onion Rate) कांद्याचे दर सलग तीन महिने घसरलेले आहेत. दराबाबत लहरीपणा असलेल्या कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय. पण आता वेळ बदलतेय. कारण चांगल्या प्रतीच्या कांद्याला 16 ते 17 रुपये किलो असा दर मिळू लागला आहे. जिल्ह्यातील जन्नुर तालुक्यातील (Aaalefata Market) आळेफाटा कृषी उत्पन्न बाजारापेठेत कांदा दरात वाढ झाली आहे. सबंध राज्यात असेच चित्र निर्माण व्हावे अशी अपेक्षा शेतकरी बाळगत आहे. खरिपातील लाल कांद्यानंतर फेब्रुवारी महिन्यापासून कांद्याचा उठावच झाला नाही. सर्वात अधिक नुकसान झाले (Summer Season) उन्हाळी कांद्याचे. पोषक वातावरणामुळे उत्पादन वाढले आणि बाजारपेठेत कवडीमोल दर. अनेक ठिकाणी तर शेतकऱ्यांनी कांदा फुकटात वाटला पण आता तीन महिन्यानंतर का होईना चित्र बदलत आहे. याची सुरवात पुणे येथून झाली असली तरी सबंध राज्यात दर वाढावेत अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
पावसामुळे घटली आवक
उन्हाळी हंगामात कांद्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने गेल्या दोन महिन्यापासून कांद्याची आवक ही सुरुच होती. शिवाय उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांकडे मुबलक पाणीसाठा आणि पोषक वातावरण यामुळे उत्पादनही भरघोस मिळाले. मात्र, बाजारपेठेत मागणीच नसल्याने कांद्याच्या दरात दिवसेंदिवस घटच होत गेली. अनेकांनी तर रोष व्यक्त करीत कांदा फुकटात वाटप केला तर कोणी कांदा पिकातच रोटर घालून इतर पिकांसाठी क्षेत्र रिकामे केले. मात्र, आता पावसामुळे आवक घटू लागली आहे. त्यामुळे दरात काही प्रमाणात का होईना सुधारणा होत आहे. चांगल्या प्रतीच्या कांद्याला 16 रुपये किलो असा दर मिळाल्याने समधान व्यक्त होत आहे.
साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांना अधिकचा फायदा
कांद्याला अपेक्षित दर नसल्यास शेतकरी कांदा हा चाळीत साठवूण ठेवतात. नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कांदा चाळ असून शेतकऱ्यांना या चाळीचाच अधिकचा फायदा होत आहे. उन्हाळी कांद्याला कमी दर मिळताच शेतकऱ्यांनी साठवणूकावर भर दिला तर काही शेतकऱ्यांकडे कवडीमोल दरात विक्री शिवाय पर्यायच नव्हता. बाजार समितीत कांद्याची आवक घटली असून मान्सूनपूर्व पावसाने या परिसरात हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेला हा कांदा वखारीत साठवून ठेवल्याने बाजार समितीत कांद्याची आवक घटल्याने बाजार भावात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
पावसाळ्यामध्ये दरवाढीचे संकेत
पावसाळ्यामध्ये कांद्याची आवक ही घटते. ज्या शेतकऱ्यांकडे साठवणूकीची सोय आहे त्यांचाच कांदा मार्केटमध्ये दाखल होतो. गेल्या काही दिवसांमध्ये वातावरणात बदल झाला असून पावसामुळे कांद्याची आवक घटताच त्याचा दरावर परिणाम होऊ लागला आहे. याची सुरवात पुणे जिल्ह्यातील आळेफाटा कृषी उत्पन्न बाजारापेठेतून झाली तरी सर्वच बाजारपेठेमध्ये असे चित्र निर्माण व्हावे ही अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.