Agricultural News : कापलेला गहू वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, भाजीपाला सडला
ज्याप्रमाणे गहू कापूस आणि संत्र्याला नुकसान झालंय, त्यापेक्षाही जास्त नुकसान झालं ते भाजी उत्पादक शेतकऱ्यांचं, पालक कोबी टमाटर या पिकांना पाण्याचा चांगलाच मार पडला असून खराब झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.
सुनील ढगे, नागपूर : कालपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचं (Farmer) चांगलचं नुकसान केलं आहे. उभ्या असलेल्या पिकांचा आणि भाजीपाल्याचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, तर झाडावर लागलेल्या संत्र्याचा बार सुद्धा खचला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गव्हाचे पीक बऱ्याच ठिकाणी कापणीवर आहे, तर काही ठिकाणी मात्र कापणी (Harwesting) झाली आहे. पण मळणी व्हायची आहे, अशा गव्हाला सुद्धा या पावसाने नुकसान पोहोचवलं आहे. शेतकऱ्यांनी आपला गहू वाचवण्यासाठी कापलेल्या गव्हाला झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला. तर उभा गहू मात्र अक्षरशः लोळलेला पाहायला मिळला आहे. त्यामुळे तो काळा पडला असून त्याची बाजारात किंमत कमी होणार आहे. तर उत्पादन सुद्धा कमी होणार आहे.
ज्याप्रमाणे गहू कापूस आणि संत्र्याला नुकसान झालंय, त्यापेक्षाही जास्त नुकसान झालं ते भाजी उत्पादक शेतकऱ्यांचं, पालक कोबी टमाटर या पिकांना पाण्याचा चांगलाच मार पडला असून खराब झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. पालकची पानं फाटली, टमाटर सडली, तर कोबीला मात्र पूर्णपणे काळपटपणा येऊन किडे लागले आहेत. या कोबीच्या शेतीचा आणि भाजीपाल्याचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात 2 दिवसात झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील गहू उत्पादक शेतकऱ्यांच मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे गहू आडवे झाले आहेत. साधारण जिल्ह्यात 50 हजार हेक्टर नुकसानीच अंदाज वर्तविला आहे. खरीप हंगामापासून रब्बी हंगामापर्यंत या गारपिटीने शेतकऱ्यांची पाठ सोडलेली नसून दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला. यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव नेर आर्णी या तीन तालुक्यात मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे.
राज्यात पुन्हा सुरु झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या अंगावर वीज पडल्यामुळे त्यांचा मृ्त्यू सुध्दा झाला आहे. आज सुध्दा अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.