परभणी : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे हे राज्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतमालाच्या नुकसानीची पाहणी करत आहे. राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी देखील करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ आज आदित्य ठाकरे यांनीही नाशिक आणि पुणे दौरा आयोजित केला आहे. त्या दरम्यान आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती बांधावर आल्यावर कळते, त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करत सरकारवर जोरदार टीका केली आहे. खोके सरकारला मदत मिळाली आहे पण ती मदत शेतकऱ्यांपर्यन्त पोहचली नाही म्हणत शिंदे सरकारवर सडकून टीका केली आहे. त्यात उद्धव ठाकरे यांनीही औरंगाबाद येथे शेतीनुकसानीची पाहणी करत शिंदे सरकारवर हल्लाबोल केला होता. यालाच प्रत्युत्तर शिंदे गटाचे आमदार तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी थेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाण साधत जोरदार टीका केली आहे.
ज्यांना बाण सुरक्षित ठेवता आले नाही, त्यांना काय बांध सुरक्षित ठेवता येईल असे म्हणत ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे.
अब्दुल सत्तार पुढे म्हणाले, चॉकलेट खाणे आणि घरी कॉम्प्युटर वर बसने वेगळे आहे , आणि बांधावर फिरणे वेगळे आहे असं म्हणत आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
याशिवाय आदित्य ठाकरेंनी त्यांच्या पपांना विचारावं बांध काय , काम काय असतं आणि बांध कुठे असतो, असे म्हणत सत्तार यांनी ठाकरेंच्या दौऱ्यावर टोला लगावला आहे.
अब्दुल सत्तार हे परभणी येथे शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर असून त्यावेळी त्यांनी ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.