Ajit Pawar : ‘अरे बापरे.. ‘ शेतकऱ्याने सांगितलेल्या व्याजाच्या गणितावर अजित पवारही अवाक् झाले! पाहा Video
Ajit Pawar in Gadchiroli News : शून्य टक्के व्याजाआधी तुम्ही कुणाकडून पैसे घ्यायचा, असा सवाल त्यांनी केला
गडचिरोली : अजित पवारांनी (Ajit Pawar in Gadchiroli) गडचिरोलीत पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी केली. यावेळी अजित पवारानी शेतकऱ्यांशी बांधावरच संवाद साधला. शेतकऱ्यांनी (Maharashtra Farmers) आपली कैफियत यावेळी अजित पवार यांच्यासमोर मांडली. धानाची शेती करण्याची शेतकऱ्यांना यावेळी अजित पवारांनी कर्जाबाबत (Farm Loan) विचारणा केली. त्यावर बोलताना अजित पवारांनी व्याजाचं गणित ऐकून ‘अरे बापरे’ अशी प्रतिक्रिया दिली आणि तेही अवाक् झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं. शून्य टक्के व्याजाच्या योजनेआधी तुम्ही कुणाकडून पैसे घ्यायचा, असा प्रश्न अजित पवार यांनी शेतकऱ्यांना विचरारला होता. त्यावर अजित पवारांना उत्तर देत शेतकऱ्यानं कसं आणि किती कर्ज, व्याज दिलं जातं, याचा हिशोबच सांगितला. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची कर्जासाठी आणि कर्जाच्या परतफेडीसाठी किती कसरत होते, हे यानिमित्तानं पाहायला मिळालं.
नेमका काय संवाद झाला?
अजित पवारांनी पाहणी करताना बांधावर उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना काही प्रश्न विचारले. शून्य टक्के व्याजाआधी तुम्ही कुणाकडून पैसे घ्यायचा, असा सवाल त्यांनी केला. त्यावर उच्चर देताना सावकार, बचतगट अशा लोकांकडून आम्ही पैसे घ्यायचो, कर्ज काढायचो, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. मग तेव्हा त्याची परतफेड करताना किती व्याज लागायचं, याचीही माहिती शेतकऱ्यांनी दिली. शेकड्याला दोन ते तीन रुपये व्याज लागायचं, अशी माहिती शेतऱ्यांनी दिली. शंभरावर तीन रुपये महिन्याला व्याज द्यावं लागायचं, इतकं सोपं करुन गणित शेतकऱ्यानं सांगितलं. हे ऐकल्यानंतर शेतकऱ्यांकडून किती मोठ्या प्रमाणात व्याज घेतलं जातंय, याची दाहकता अजित पवारांना आली आणि आपसूकच त्यांच्या तोंडून ‘अरे बापरे, ते तर फार झालं’ असे शब्द निघाले.
पाहा व्हिडीओ :
‘सगळ्या गोष्टी केल्या. नांगरणी, पेरणी, चिखल, ही शेतीची सगळी प्रक्रिया करुन आता पुरामध्ये 25 हजार रुपयांचं एका एकरात नुकसान शेतकऱ्यांचं झालं. ज्याची पाच एक शेती आहे, त्याचं तर सव्वा लाखाच्या आसपास नुकसान झालं आहे. दुहेरी संकटात शेतकरी अडकला असून महामंडळाकडूनही शेतकऱ्यांचे हाल सुरु आहेत’ असा आरोपही यावेळी करण्यात आला. त्यामुळे सरकारदारी शेतकऱ्यांची काळजी करणारं खरोखरंच कुणी जन्मलेलं नाहीये अजूनही, असं म्हणत शेतकऱ्यांनी अजित पवारांसमोर संताप व्यक्त केला.
गडचिरोलीमध्ये अजित पवार पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करत होते. यावेळी धानाच्या शेतीचं प्रचंड नुकसान झालं असल्याचं त्यांनी पाहिलं. पुराच्या पाण्यात धान पूर्णपणे झोपला. आता करायचं काय, कर्जाची परतफेड करण्यासाठी जे पिक पेरलं होतं, त्यावरच संकट ओढवल्यानं आता पैसे कुठून आणायचे, या विचाराने शेतकरी हतबल झालेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांत विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याच्या घटनांनीही चिंता वाढवली आहे. पुरानं पिक गिळलं, कर्जाचा फेरा, त्यानंतरही पिक आलं, तर त्यातून मालाला किती भाव मिळणार, यावरही शंका, असं संकट शेतकऱ्यांच्या समोर उभं आहे. या सगळ्यावर पूरग्रस्त शेतकऱ्यांनी अजित पवारांचं लक्ष वेधलं.