जळगाव : मध्यंतरी बाजारपेठेत (Mango Arrival) आंब्याची आवक होताच कलिंगडचे दर गडगडले होते. जे कलिंगडच्या बाबतीत झाले तेच आता खानदेशात आंबा उत्पादकांच्या बाबतीत होत आहे. जिल्ह्यात (Temperature Increase) वाढत्या तापमानामुळे आंबा आणि संत्र्याची आवक कमी झाली आहे. याचा फायदा मात्र, (Banana) केळी उत्पादकांना होताना दिसत आहे. कारण हंगामाच्या सुरवातीपासून केळी पिकाची दराबाबत परवड सुरु होती. अखेर हंगामाच्या अंतिम टप्प्यात का होईना दिलासा मिळू लागला आहे. केळीला प्रतिक्विंटल 1 हजार 400 असा दर मिळत आहे. खानदेशात प्रतिकूल परस्थितीमध्येही केळी उत्पादनात वाढ झाली पण शेतकऱ्यांना वाढीव दराची प्रतिक्षा होती ती आता पूर्ण होतान पाहवयास मिळत आहे.
राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असली तरी खानदेशात मात्र उन्हाच्या झळा कायम आहेत. जिल्ह्याचे तापमान हे 44 अंशावर गेल्याने आंबा फळपिकावर याचा परिणाम झाला आहे. वातावरणातील बदलामुळे आंबा उत्पादन हे घटलेले आहेच शिवाय बाजारपेठेत दाखल होणारा आंबा वाढत्या तापमानामुळे डागाळत आहे. तर दुसरीकडे संत्रीची आवक दिवसेंदिवस घटत आहे. या दोन्हा बाबींचा परिणाम थेट केळीवर झाला आहे. हंगामात पहिल्यांदाच केळीची मागणी तर वाढली आहेच शिवाय दरही वधारले आहेत.
हंगामाच्या सुरवातीला केळीची बाजारपेठेतील आवक आणि वातावरणातील बदलाचा झालेला परिणाम यामुळे 600 ते 700 रुपये क्विंटल असे दर होते. दरावरून व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये सातत्याने मतभेदही झाले होते. अखेर व्यापारी ठरवतेल त्याच दरात केळी विक्रीची नामुष्की उत्पादकांवर ओढावली होती. अखेर आता परस्थिती बदलत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन असलेल्या रावेर येथील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळाला आहे.
केळी हे बारमाही बाजारपेठेत असलेले फळपिक आहे. त्यामुळे इतर फळपिकांची आवक होताच त्याचा परिणाम हा केळीवर ठरलेलाच आहे. मे महिन्याच्या सुरवातीपासून बाजारपेठेत आंब्याची आवक वाढली आहे. त्यामुळे केवळ केळीवरच नाही तर कलिंगडच्या दरावरही परिणाम झाला होता. पण घटलेले उत्पादन आणि आता वाढलेले तापमान या दोन्ही बाबींचा परिणाम बाजारपेठेतील आवकवर झाला आहे. आंबा आणि संत्रीची आवक घटली तरी दुसरीकडे केळीची आवक ही कायम आहे. त्याचाच फायदा रावेरच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे.