निधी मिळताच 3 वर्षांनी कृषी पंपाला वीज जोडणी, 400 शेतकऱ्यांना दिलासा, आणखी निधी…
शासनाकडून अपुरा निधी मिळाल्यामुळे इतर शेतकऱ्यांनी वीज कनेक्शन अद्याप मिळालेलं नाही. जितका निधी उपलब्ध झाला, तितक्या लोकांना वीज कनेक्शन देण्यात आलं आहे.
भंडारा : निधी मिळताच 3 वर्षांनी भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपाला वीज जोडणी (Power connection to agricultural pump) मिळाली असून शासनाकडून निधी (maharashtra government funds) मिळाल्याने महावितरनने कृषी पंपाला वीज पुरविली आहे. याचा फायदा भंडारा जिल्ह्यातील 400 शेतकऱ्यांना झाला असून त्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान अजून निधीची प्रतिक्षा असून इतर शेतकरी कृषी पंपासाठी वीज कनेक्शन मिळण्याची वाट पाहत आहेत. शासनाकडून अपुरा निधी मिळाल्यामुळे इतर शेतकऱ्यांनी वीज कनेक्शन अद्याप मिळालेलं नाही. जितका निधी उपलब्ध झाला, तितक्या लोकांना वीज कनेक्शन देण्यात आलं आहे.
भंडारा जिल्ह्यात कृषी पंपासाठी डिमांड भरूनही तब्बल संख्या 4 हजार 373 शेतकऱ्यांना कृषीपंपाला वीज कनेक्शन मिळावे म्हणून प्रतीक्षा करावी लागली आहे. राज्य सरकारने 2020 मध्ये कृषी धोरण जाहीर केले. मात्र, कृषी धोरण जाहीर झाल्यानंतरही शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने वीज जोडणी देणे अडचणीचे झाले आहे. दरम्यान आता शासनाने निधी उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात वीज जोडण्या दिल्या जात आहेत.
यासाठी त्यांना गेल्या तीन वर्षांपासून वाट पाहावी लागली. शेतकऱ्यांना सिंचनासाठी विहिरी, बोअरवेल, शेततळ्याचा लाभ दिला जातो. सरकारनेही सिंचनाच्या सुविधेसाठी कृषीपंप देण्याची योजना राबविली आहे. त्यासाठी आवश्यक वीज कनेक्शनच देण्यात येत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. मागील काही वर्षांत पारंपरिक शेतीला फाटा देऊन शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरली आहे. आधुनिक शेतीमुळे नवनव्या अवजारांचा वापर शेतीमध्ये केला जात आहे. त्याचे अनेक फायदेही शेतकऱ्यांना मिळत आहे. मात्र अशा पद्धतीच्या शेतीसाठी शेतशिवारामध्ये वीज असणे आवश्यक असते.
विशेषत: मुबलक पाणी असतानाही केवळ कृषीपंपाची वीजजोडणी झालेली नसल्याने अनेकांना शेतीला पाणी देता येत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान आता जिल्ह्यात शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळायला सुरुवात झाली आहे. दरम्यान महावितरणच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2022 पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी डिमांडची रक्कम भरली आहे. त्यापैकी आतापर्यंत 1942 शेतकऱ्यांना कृषीपंपांची जोडणी देण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना प्राधान्याने जोडण्या देण्यासाठी शासनाकडून आतापर्यंत 36.82 कोटी रुपये भंडारा महावितरणला प्राप्त झाले आहेत. त्यातून 31 ते 200 मीटरपर्यंत आणि 201 ते 600 मीटरपर्यंतचे कनेक्शन दिले जात आहे. शेतीला पाणी देता येत असल्याने शेतकरी दुहेरी पीक घेणे शेतकऱ्यांना शक्य होईल.