बियाणे खरेदी करताना सावधान, बोगस बियाण्यांचा सुळसुळाट, सव्वा कोटीचे बोगस बियाणे जप्त
कोट्यवधी रुपयांचे बोगस बियाणे जप्त करण्यात आले. चौघांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे इतर बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.
संदीप वानखेडे, प्रतिनिधी, बुलढाणा : बियाणांची जमवाजमव सुरू करण्यात आली आहे. कंपन्या बियाणे तयार करत आहेत. काही बोगस कंपन्यासुद्धा आपले बियाणे बाजारात आणत आहेत. याची माहिती मिळताच बुलढाणा कृषी विभागाच्या वतीनं संबंधितांचे सुमारे कोट्यवधी रुपयांचे बोगस बियाणे जप्त करण्यात आले. चौघांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे इतर बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.
बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली एमआयडीसी परिसरातील गोडाऊनमध्ये अवैधरित्या सोयाबीन बियाणे साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाली. वरिष्ठांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेचे बियाणे निरीक्षक विजय खोंदील यांनी आपल्या पथकासह चिखली एमआयडीसी परिसरात चौकशी केली. या चौकशीनंतर राणाजी सीड्स आणि ग्रीन गोल्ड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद या गोडाऊनवर छापा मारण्यात आला.
सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त
गोडाऊनमध्ये ग्रीन गोल्ड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद अशा लिहिलेल्या सोयाबीन बियाण्यांच्या बॅग आढळून आल्या. या संदर्भात संबंधित व्यक्तींना कागदपत्राची मागणी केली असता त्यांनी कुठलेही अधिकृत कागदपत्रे सादर केली नाही. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोडाऊनमधील प्रत्येकी 25 किलो वजनाचे असलेल्या 2 हजार 949 बॅग जप्त केले.
तसेच प्रती 70 किलोच्या 269 बॅग्य अशा एकूण 925 क्विंटल सोयाबीन, इलेक्ट्रिक वजन काटे, मशीन आणि इतर साहित्य असा एकूण 1 कोटी 21 लाख 5 हजार 150 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर या साहित्याला गोडाऊन सील करण्यात आले आहे.
या चौघांवर करण्यात आली कारवाई
गणेशराव सोळंकी, संदीप बावीस्कर, अजित मुळे, मधुकर मुळे या चार जणांविरोधात नियमबाह्य सोयाबीन बियाण्यांचा साठा केल्याप्रकरणी बियाणे निरीक्षक विजय खोंदील यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून बियाणे अधिनियम आणि भारतीय दंड संहितेनुसार विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक मनोज ढगे यांनी दिली.