Video ! सक्तीची वीजबिल वसुली थांबवा ; मुंबई-आग्रा महामार्गावर भाजपचा रास्तारोको
सध्या एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. दिवसभरात किमान एकदा तरी शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा ही होतेच मात्र, असे असूनही समस्यांवर तोडगा निघत नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या काळातच सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी मुंबई-आग्रा या महामार्गावर भाजपाचे आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या नेतृत्वामध्ये रास्तारोको करण्यात आला होता.
लासलगाव : सध्या एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. दिवसभरात किमान एकदा तरी शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा ही होतेच मात्र, असे असूनही समस्यांवर तोडगा निघत नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या काळातच (State Government) सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी मुंबई-आग्रा या महामार्गावर भाजपाचे आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या नेतृत्वामध्ये रास्तारोको करण्यात आला होता. ऐन गर्दीच्या प्रसंगीच हा रास्तारोको करण्यात आल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. (Electricity connections) विजजोडणी पासून ते नुकसानभरपाई बाबतच्या मागण्या या आंदोलना दरम्यान करण्यात आल्या होत्या. तब्बल 2 तास सुरु असलेल्या रास्तारोकोमध्ये शेतकरी आणि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
काय आहेत मागण्या ?
यंदाच्या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीच्या काळात बळीराजाला हातभार लावण्याचे काम हे मायबाप सरकारचे असते, मात्र, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यामध्ये हे महाविकास आघाडी सरकार अपयशी झाल्याचा आरोप यावेळी आ. राहुल आहेर यांनी केला. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून एकरी 50 हजाराची मदत करावी, पिकवीमा भरलेल्या शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता सरसकट मदत करावी, सक्तीची विजबील वसुली रद्द करुन विजजोडणी करावी एवढेच नाही तर नादुरुस्त झालेले रोहित्र शेतकऱ्यांना 24 तासाच्या आतमध्ये दुरुस्त करुन देण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी : आ. आहेर
शेतकऱ्यांना यंदा नैसर्गीक आपत्तीबरोबरच सुलतानी संकटालाही सामोरे जावे लागत आहे. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील तसेच फळबागांचेही नुकसान झाले आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत देणे गरजेचे होते. उलट रब्बी हंगामातील पीके बहरात असतानाच राज्य सरकारने विद्युत पुरवठा खंडीत करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्य आणि कामगारांच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरले असल्याचा आरोप भाजपचे आमदार डॉ.राहुल आहेर यांनी केला आहे.
रास्तारोको दरम्यान माणुसकीचे दर्शन
मुंबई-आग्रा या महामार्गावर रास्तारोको सुरु असताना अचानक रुग्णवाहिका आली होती. त्या दरम्यानच वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. मात्र, वाहनांच्या गर्दीमधून त्या रुग्णवाहिकेला वाट मोकळी करुन देण्यासाठी आंदोलनकर्तेही सरसावले होते. अवघ्या काही मिनिटांमध्येच रुग्णवाहिकेला मार्ग देऊन आंदोलनकर्त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवून दिले होते.