बियाणे अधिक किमतीने विकत असल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, कृषी केंद्र चालकांना चोप देण्याची…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांची कृषी अधिकाऱ्यांना धमकी, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी केंद्रांना पाठीशी घातल्यास कृषी अधिकाऱ्यांना चोप देऊ असं सांगण्यात आलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या कालच्या प्रकारामुळे संघटना आक्रमक झाली आहे.
गणेश सोळंकी, बुलढाणा : खरीप हंगामाच्या (Kharip Season) तोंडावर बुलढाणा (Buldhana Farmer News) जिल्ह्यात शेतकऱ्यांचे फसवणुकीचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात अंकुर कृषी केंद्रावर शेतकऱ्यांकडून सोयाबीन बियाणांवर प्रतिबॅक 600 रुपये जादा वसूल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. त्या प्रकरणाला दोन दिवस झाले आहेत. परंतु त्या दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना (SWABHIMANI SHETKARI SANGHTANA) राज्यात आक्रमक झाली असून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना चोप देण्याची धमकी देण्यात आली आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरणीची तयारी सुरु केली आहे. शेतकऱ्यांनी सुध्दा बियाणे किंवा खत घेताना काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
पाठीशी घातलं तर कृषी अधिकाऱ्यांना…
दोन दिवसांपूर्वी कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा प्रकार उजेडात आला. कृषी केंद्र चालक अधिक पैसे उकळत असल्याचं सिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तिथं मोठा गोंधळ घातला होता. कृषी अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यानंतर शेतकरी शांत झाल्याचे पाहायला मिळाले.
याप्रकरणी अंकुर कृषी केंद्राचा परवाना रद्द करण्यात आला असून त्याचे बियाणे असलेलं गोडावून सिल करण्यात आले आहे. याआधी सुद्धा शेतकऱ्यांच बियाणं मोठ्या प्रमाणात अवैधरित्या साठवणूक केल्या जात असल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांना कृषी केंद्र चालक मोठ्या प्रमाणात लुटत असल्याचं पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीने अंकुर कृषी केंद्रावर कारवाई करण्यात आली, त्याचपद्धतीने इतर कृषी केंद्रांवर देखील शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल, तर कारवाई केली पाहिजे , अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून करण्यात आली आहे. यावेळी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी केंद्र चालकांना जर कृषी अधिकाऱ्यांनी पाठीशी घातलं तर कृषी अधिकाऱ्यांना आणि कृषी केंद्र चालकांना चोप देऊ अशी धमकी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांनी दिली.