सरकारला आमची प्रेतं पहायची असतील तर अरबी समुद्रात पाहा, हजारो शेतकरी मुंबईच्या दिशेने, मागण्या काय?
आमचं आंदोलन दडपून टाकण्याचे प्रयत्न सुरु आहेत, तरीही आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी मांडली.
विवेक गावंडे, बुलढाणाः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या (Farmers) मागण्यांकडे सरकार लक्ष देत नाहीये. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकारला आमची प्रेतच पहायची असतील तर आता अऱबी समुद्रात (Arabian sea) पहा. मंत्रालयाच्या खिडकीतून तुम्ही हे दृश्य पहा, असा निर्वाणीचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिला आहे. बुलढाण्यातील हजारो शेतकरी आता मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. अरबी समुद्रात हे शेतकरी जलसमाधी आंदोलन करणार आहेत. विशेषतः सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव द्यावा, नुकसान भरपाई मिळावी, अशा मागण्या या शेतकऱ्यांच्या आहेत.
रविकांत तुपकर यांनी टीव्ही9 शी बातचित केली. ते महणाले, ‘ या वर्षी अति पावसाने सोयाबीन आणि कापसाचं नुकसान झालंय, त्याची नुकसानभरपाई मिळालेली नाही. उत्पादन खर्च भरून निघणार नाही, अशी परिस्थिती आहे. एका क्विंटलचा भाव 6 हजार रुपये आहे.
बाजारात मिळणारा भाव 5 ते साडेपाच हजार रुपये आहे. हे दर कमी होत आहेत. कापसाचे दर उतरले आहेत. अशा स्थितीत सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. गेले महिनाभरापासून आम्ही आंदोलन करत आहोत, पण सरकार दखल घेत नाहीये, असा आरोप रविकांत तुपकर यांनी केला.
6 नोव्हेंबरला आम्ही बुलढाण्यात 50 हजार शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. आमचं जगणं मान्य करा, अशी हाक सरकारला दिली. सरकारला आमचे प्रेतच पहायची असतील तर ती अरबी समुद्रात पहावीत, आम्ही हजारो शेतकरी मुंबईच्या दिशेने निघालो आहोत…
सरकार निगरगठ्ठ झालं आहे. सोयाबीन उत्पादक शेतकरी 50 टक्के आहे तर कापूस उत्पादक शेतकरी 18 टक्के आहे. 68 टक्के शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ खेळण्याचं काम सरकार करतंय, असा इशारा तुपकर यांनी दिला…
सरकारने या प्रश्नावर काय चर्चे केली, असा प्रश्न विचारला असता रविकांत तुपकर म्हणाले, ‘ आम्हाला चर्चेलाही बोलावलं जात नाहीये. शेतकऱ्यांना मदत मिळाली तर त्याचं श्रेय आम्हाला जाईल, असं सरकारला वाटत असेल तर त्याचं श्रेय तुम्ही घ्या. पण सोयाबीनला साडे आठ हजार रुपये तर कापसाला कमीत कमी साडे 12 हजार रुपये भाव द्या, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली.
रब्बीचा हंगाम सुरु आहे. रात्रीची नको तर दिवसाची वीज हवी आहे. मात्र ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे आम्हाला तेही दिले जात नाहीये. रात्री आम्ही शेताला पाणी कसे देणार, पिकविमा कंपन्यांनी आम्हाला फसवलं आहे.
काहीही झालं तर मागे हटणार नाही. पोलिसांनी कितीबही दबाव आला तरी आम्ही आंदोलनातून माघार घेणार नाही. पोलिसांनी आम्हाला आंदोलन न करण्याची नोटीस दिली आहे. आमचं आंदोलन दडपून टाकण्याचे प्रयत्न सुरु आहेत, तरीही आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी मांडली.