येथील मिरची मार्केट तेजीत, परराज्यातील व्यापारी उतरले लिलावात; म्हणून मिरची उत्पादक शेतकरी समाधानी
कृषी उत्पन्न बाजार समितीने नुकतेच मिरची मार्केटमध्ये पाऊल टाकले. दर शनिवारी होणाऱ्या मिरची लिलावाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दुरदुरून व्यापारी यासाठी येथे दाखल होत आहे.
चंद्रपूर : कृषी उत्पन्न बाजार समितीने नुकतेच मिरची मार्केटमध्ये पाऊल टाकले. दर शनिवारी होणाऱ्या मिरची लिलावाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दुरदुरून व्यापारी यासाठी येथे दाखल होत आहे. 23 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने मिरची उत्पादक शेतकरी समाधानी आहेत. धान- कापूस -सोयाबीन यासाठी जिल्ह्यातील शेतकरी ओळखला जातो. मात्र रब्बी हंगामात चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. राजुरा उपविभागात आणि वरोरा, भद्रावती या भागात उत्तम मिरची पीक घेतले जाते. मिरची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये वाढ होत असल्याने मिरचीचे बंपर उत्पादन होत आहे.
मिरची व्यापार तेजीत
सुकी लाल मिरची याआधी नागपूर अथवा मध्यप्रदेशच्या बाजारपेठेत विक्रीस न्यावी लागत होती. तिला भाव देखील कमी मिळत होता. याशिवाय वाहतूक आणि निवास याचा खर्च वजा करता हा तोट्याचा सौदा ठरत होता. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने मिरची मार्केटमध्ये पाऊल टाकले. यंदा मिरची व्यापार तेजीत आहे.
या वाणाला चांगला प्रतिसाद
दिल्ली -राजस्थान -मध्य प्रदेश -आंध्र प्रदेश -तेलंगणा या राज्यातून मिरची व्यापारी चंद्रपुरात दाखल होत आहेत. बाजार समितीने शनिवार हा दिवस मिरची लिलावासाठी निश्चित केला आहे. शेतकरी आपला माल या बाजारात आणत आहेत. अरुणीमा, सी 5, 341, वनराज, हनुमान, जांभूळघाटी आदी मिरची वाणाला व्यापारीवर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद
चंद्रपूर हे सर्व बाजूंनी वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे ठिकाण आहे. बाहेरून येणारे व्यापारी आणि स्थानिक उत्पादक शेतकरी यांना चंद्रपुरात मिरची आणणे सोयीचे जात असल्याचे व्यापा-यांचे मत आहे. या संपूर्ण लिलाव प्रक्रियेत अधिक संख्येने व्यापारी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनाही नेहमीपेक्षा चांगला भाव मिळत असल्याचे व्यापारी गोपाल सारडा यांनी सांगितलं.
वाहतूक खर्च कमी
मिरची व्यापाऱ्यांमध्ये असलेली स्पर्धा लक्षात घेता शेतकऱ्यांनाही चांगल्या दर्जाचे मिरची वाण असल्यास चांगला भाव मिळत आहे. याशिवाय छोट्या मिरची उत्पादक शेतकऱ्यांना लांब जावे लागत नाही. त्यामुळे त्यांचा वाहतूक खर्च देखील कमी झाला आहे, असं बाजार समितीचे सचिव संजय पावडे यांनी सांगितलं.
खरिपाच्या हंगामात धान- कापूस- सोयाबीन तर रब्बी हंगामातील मिरची पिकाने शेतकऱ्याला उभारी दिली आहे. दर शनिवारी होणारा हा मिरची लिलाव शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे. यामुळे चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीलाही चांगला व्यवसाय मिळत आहे.