डाळिंब बाग वाचवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड, त्याने केलेल्या युक्तीचे होते सर्वत्र कौतुक
पावसाने दडी मारल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यातच उष्णतेचे प्रमाण अधिक वाढले आहे. वाढत्या तापमानामुळे डाळिंब फळांवर काळे डाग येण्याचा धोका वाढला आहे.
रवि लव्हेकर, पंढरपूर, १ सप्टेंबर २०२३ : राज्यात सध्या पावसाची गरज आहे. शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहत आहे. जमिनीला भेगा पडल्या आहेत. उभी पिकं करपू लागली आहेत. या पिकांना वाचवायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी पाणी देत आहेत. पण, काही ठिकाणी अद्याप पुरेसे सिंचन झाले नाही. त्यामुळे पिकं वाचवण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. सोलापूर जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत फारसा पाऊस पडला नाही. जिल्ह्यात उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या उष्णतेपासून डाळिंब बागा वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत.
डाळिंबावर कापडी आच्छादन
सांगोला तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबावर कापडी अच्छादन टाकले. यातून डाळिंब बागांचे संरक्षण केले आहे. पावसाने दडी मारल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यातच उष्णतेचे प्रमाण अधिक वाढले आहे. वाढत्या तापमानामुळे डाळिंब फळांवर काळे डाग येण्याचा धोका वाढला आहे. शिवाय झाडांवर मर रोग येण्याची शक्यताही बळावली आहे. उष्णतेमुळे होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून डाळिंब बागांचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी ही शक्कल लढवली आहे. त्याची परिसरात चर्चा होत आहे.
खरीप पिके सलाईनवर
जळगाव जिल्ह्यात तब्बल एक महिन्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेली कोवळी पिके आता कोमेजू लागली आहेत. मध्यंतरी तुरळक पावसाचा अपवाद वगळता वातावरणात कोणताही बदल नाही. त्यामुळे हवेच्या सहाऱ्याने तग धरून असलेली पिके तप्त उन्हामुळे माना टाकत आहेत. पावसाला अजून उशीर झाल्यास अनेक पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे.
लांबलेल्या पावसाचा केवळ जिरायतीचे नव्हे तर बागायत पिकांना सुद्धा फटका बसत आहे. दुसरीकडे पावसाची वाट पाहत अनेक शेतकऱ्यांनी केळी लागवड केलेली नाही. आधी लागवड झालेल्या इतर बागायती पिकांना तत्काळ ठिबकने पाणी द्यावे लागत आहे. रावेर तालुक्याचे एकूण वाहिताखालील क्षेत्रफळ ५२ हजार ६९३ हेक्टर आहे.
बहार आलेल्या कपाशीचे सर्वाधिक होतेय नुकसान
जून महिन्यात लागवड केलेली कपाशी आता फुल आणि कैरी लागण्याचा बहारात आहे. यावेळी कैरी परिपक्व होण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. पण, पावसाअभावी बहार वाया जाण्याची स्थिती आहे. पुरेशा पाण्याअभावी फुल पाती लागलेल्या झाडाची वाढ खुटते. पाणी न मिळाल्यास फुलपातीची गळती सुरु होते.