डीएपीची 700 रुपयांनी दरवाढ, 73 वर्षात हे कधीचं घडलं नाही, हा अन्नदात्याला गुलाम करण्याचा डाव, काँग्रेसचा आरोप
रासायनिक खतांच्या आणि बियाणांच्या दरवाढीचा मुद्दा चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे. fertilizer rates hike
नवी दिल्ली: रासायनिक खतांच्या आणि बियाणांच्या दरवाढीचा मुद्दा चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून खतांच्या किमती कमी करण्याची मागणी केली. त्यानंतर आज काँग्रेसने देखील केंद्र सरकारवर खतांच्या किमतीवरून निशाणा साधला आहे. केंद्र सरकारने डीएपीच्या पन्नास किलोच्या पोत्यावर 700 रुपयांची दरवाढ केली आहे. त्याशिवाय इतर खतांच्या किमती देखील वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर दर वर्षी 20 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. हा केंद्र सरकारचा या निर्णयाद्वारे अन्नदात्याला गुलाम बनवण्याचा प्रयत्न आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला. (Congress Spoke Person Randeep Surjewala slams Modi Government over fertilizer rates hike)
62 कोटी शेतकऱ्यांना गुलाम बनवण्याचं षड्यंत्र
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला केंद्र सरकारवर निशाणा साधताना खतांच्या किमती कमी करण्याची मागणी केली. देशातील मोदी सरकारला 62 कोटी शेतकरी आणि मजुरांना गुलाम बनवायचं आहे. गेल्या सहा वर्षांपासून सरकारने शेती मध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूची किंमत वाढवून शेतकऱ्यांवर यापूर्वी पंधरा हजार रुपयांचा प्रतिहेक्टर बोजा टाकलेला आहे, असाही आरोप केला. रणदीप सुरजेवाला पुढे बोलताना म्हणाले की, महागाईच्या आड लपून डीएपी आणि इतर खतांच्या किमती वाढवून पुन्हा एकदा मोदी सरकार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचा काम करतेय. यामुळे शेतकऱ्यांवर दरवर्षी 20 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.
भाजपचा डीएनए शेतकरी विरोधी
खतांच्या किमती बियाणांचे किमती वाढवणं हे भाजपचा डीएनए शेतकरीविरोधी आहे हे दाखवून देतं असाही आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. काँग्रेसने आणखी एक आरोप यानिमित्ताने केला आहे तो म्हणजे डीएपी खताच्या पन्नास किलोच्या पोत्या मागं सातशे रुपयांची दरवाढ ही शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी आहे. गेल्या 73 वर्षात हे कधीच घडलं नाही. डीएपी खताची किंमत थेट 1200 रुपयांवरून 1900 रुपयांवर गेली असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे.
शरद पवारांचं सदानंद गौडा यांना पत्र
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून खतांच्या किमतीतील दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने शेतकरी होरपळून निघालेला असताना ही दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशी टीकाही शरद पवारांनी केली आहे. शरद पवार यांनी हे पत्रं ट्विटही केलं आहे. या पत्रातून पवारांनी सदानंद गौडा यांचं देशातील कोरोनाची परिस्थिती आणि शेतकऱ्यांवरील संकटाची माहिती दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जनतेवर प्रचंड परिणाम झाला आहे.
अनेकांचे आयुष्य त्यामुळे उद्ध्वस्त झालं आहे. शेतकऱ्यांवरही या आजाराचा मोठा परिणाम झाला असून त्यांच्या अडचणी सोडवण्याची गरज आहे. मात्र, असं असताना शेतकऱ्यांना मदत करण्याचं सोडून सरकारने खतांच्या दरांमध्ये वाढ केल्याचं मी ऐकलं आहे. आधीच लॉकडाऊनमुळे बाजार पूर्णपणे कोलमडला आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आला आहे. अशा वेळी केंद्राचा हा निर्णय थेट शेतकऱ्यांवर परिणाम करणारा आहे. एकीकडे इंधनाचे दर वाढत आहे. त्यात कोरोनाचं संकट आहे, असं असताना सरकारने खतांच्या किमतीत वाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे, असं पवारांनी पत्रात म्हटलं आहे.
The second wave of #COVID19 Pandemic has impacted heavily on our people, devastating their every means of livelihood. The farming community is reeling under one of the worst ever crisis and their issues need to be addressed immediately.@DVSadanandGowda @PMOIndia pic.twitter.com/IHw0pBhpIJ
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 18, 2021
संबंधित बातम्या:
केंद्राने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले, खतांची दरवाढ मागे घ्या; शरद पवारांचे सदानंद गौडांना पत्रं
डीएपीच्या किमती कमी करा, यूरियासारखं इतर खतांवर सबसिडी द्या, दादा भुसेंचं केंद्राला पत्र
(Congress Spoke Person Randeep Surjewala slams Modi Government over fertilizer rates hike)