या मार्गावर बांबू क्रास बॅरिअरची निर्मिती; येथे करण्यात आला देशातील पहिला प्रयोग
बालकोआ प्रकारातील हा बांबू विशिष्ट प्रक्रिया करून अधिक मजबूत व बारमाही वातावरणासाठी टिकाऊ बनविण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांबूची उपलब्धता आहे.
चंद्रपूर : गडचिरोली, चंद्रपूर भागात मोठ्या प्रमाणात बांबूचे उत्पादन होते. बांबू हा वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जातो. त्यामुळे या बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या जातात. रस्त्याच्या बाजूल बॅरिअर म्हणूनही आता बांबूचा वापर केला गेला. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी बांबू क्रास बॅरिअरबाबत ट्विट करत माहिती दिली. देशात प्रथमच रस्ते उभारणी कामात बांबू क्रास बॅरिअरचा वापर करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा ते वणी या मार्गाचे नव्याने बांधकाम केले जात आहे. यादरम्यान चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर वर्धा नदीवर मोठा पूल बांधला जात आहे. या पुलाच्या परिसरात या बांबू क्रास बॅरिअरची उभारणी करण्यात आली आहे. एरवी देशभर महामार्गाच्या बाजूला स्टील मिश्रित क्रास बॅरिअरची उभारणी केली जाते. मात्र बांबूचा वापर करून क्रास बॅरिअरची उभारणी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
बांबू व्यवसायाला चालना मिळणार
बालकोआ प्रकारातील हा बांबू विशिष्ट प्रक्रिया करून अधिक मजबूत व बारमाही वातावरणासाठी टिकाऊ बनविण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांबूची उपलब्धता आहे. अशा स्थितीत पर्यावरण अनुकूल असलेला बांबू रस्ते निर्मितीच्या कामात क्रास बॅरिअरच्या रूपात वापरला गेल्यास बांबू व्यवसायाला चालना मिळणार आहे. बांबू हा बहुउपयोगी आहे. त्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जातात. घरसुद्धा फक्त बांबूपासून तयार केला जातो. आता रस्त्याच्या बाजूला बॅरिअर म्हणून या बांबूचा वापर करण्यात आला.
२०० मीटर बांबू क्रास बॅरिअर
बांबू क्रास बॅरिअरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या बॅरिअरचा 50 ते 60 टक्के फेरवापर करता येणार आहे. दळणवळण मंत्रालयाच्या देशातील विविध प्रयोगशाळांमध्ये या बांबू क्रास बॅरिअरची अग्नीरोधक व क्षमता विषयक तपासण्या केल्यानंतर याची उभारणी करण्यात आली. सध्या 200 मीटर बांबू क्रास बॅरिअर उभारण्यात आला आहे. या प्रयोगाचे परिणाम पाहून देशात इतरत्र असा प्रयोग राबविला जाणार आहे. बांबू क्रास बॅरिअरच्या उभारणीमुळे देशात रस्ते निर्मितीच्या बाबतीत मेक इन इंडियाचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे.