अर्धा जुलै संपला, तरीही पीक कर्ज वाटप रखडलं, बँकांनी हात आखडला!
नाशिक जिल्ह्यात बँकेच्या दारात आजही शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी दररोज खेटे घालावे लागत आहेत. जुलैचा पंधरवडा उजाडला तरी जिल्ह्यात खरिप पीक कर्जवाटप 50 टक्केही झालेलं नाही.
नाशिक : मंत्रिमोहदय शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबत (Crop loan) भल्याभल्या घोषणा करत आहेत. मात्र दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात बँकेच्या दारात आजही शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी दररोज खेटे घालावे लागत आहेत. जुलैचा पंधरवडा उजाडला तरी जिल्ह्यात खरिप पीक कर्जवाटप 50 टक्केही झालेलं नाही. एकूण 2 हजार 780 कोटी उद्दिष्टापैकी फक्त 1 हजार 161 कोटीचं पीक कर्ज वाटप बँकांनी केलं आहे. त्यात जिल्हा बँकेने 71 टक्के कर्जवाटप केले आहे. तर, खासगी आणि ग्रामीण बँकांनी जेमतेम 30 टक्क्यांच्या आसपास कर्जवाटप केले असून, शेतकर्यांना कर्जवाटपास हात आखडता घेतला आहे.
जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली आहे. जून महिना कोरडाठाक गेला असून, जुलै महिन्याच्या प्रारंभीही पावसाने शेतकर्यांची निराशाच केली. दमदार पावसाअभावी जिल्ह्यात जेमतेम 14 टक्के पेरण्या झाल्या आहेत. पावसाच्या दांडी यात्रेमुळे शेतकर्यावर दुबार पेरणीची टांगती तलवार आहे. त्यात पीक कर्ज वाटपात बँकांनी आखडता हात घेतल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.
बँकांची टाळाटाळ
बी बियाणे, खते पेरणीपूर्व तयारीसाठी शेतकर्यांना आर्थिक मदतीची गरज असताना, बँकाकडून शेतकर्यांना सढळ हाताने कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तर राष्ट्रीयकृत, खासगी , ग्रामीण बँका कर्ज वाटपात पिछाडीवर असून, सढळ हाताने कर्ज देत नसल्याचा आरोप शेतकर्यांकडून केला जात आहे. एकीकडे वरुण राजाच्या अवकृपेमुळे दुबार पेरणीचे संकट, दुसरीकडे बँकेकडून कर्ज देण्यास केली जाणारी टाळाटाळ, यामुळे बळीराजाची दोन्ही बाजूकडून कोंडी झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात किती पीककर्ज वाटप?
बँकनिहाय पीककर्ज वाटप
जिल्ह्यात एकूण उद्दिष्ट – २ हजार ७८० कोटी
१) राष्ट्रीयकृत बँक
– उद्दिष्ट – १ हजार ८७२ कोटी – वाटप – ६७६ कोटी – ३६ टक्के
२) खासगी बँक – उद्दिष्ट – ३६५ कोटी – वाटप – १०१ कोटी – २७ टक्के
३) ग्रामीण बँक – उद्दिष्ट – ८ कोटी – वाटप – २ कोटी – ३२ टक्के
४) जिल्हा बँक – उद्दिष्ट- ५३५ कोटी – वाटप – ३८२ कोटी – ७१ टक्के
या महिनाअखेरपर्यंत कर्ज पूर्ण वाटप होईल असं बँकेकडून सांगण्यात येतंय. मात्र शेतकऱ्यांचा आर्थिक विचार करता त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. अन्यथा आधीच कोरोनाच्या संकटात सापडलेला बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडेल.
संबंधित बातम्या
पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची परवड सुरुच, राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकाच्या भूमिकेमुळे शेतकरी संतप्त
शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी दरडावलं