Nandurbar : सेंद्रीय पध्दतीने 21 एकरामध्ये बहरली आमराई, मार्केटमध्येही वेगळाच रुबाब
पारंपरिक पध्दतीने फळबागांची लागवड केली तर उत्पादनात घट ही ठरलेलीच आहे. त्यामुळे पीक पध्दतीमध्येच नव्हे तर आता फळबागांमध्ये देखील बदल पाहवयास मिळत आहे. अधिकच्या उत्पादनाच्या दृष्टीने दत्तू चौधरी यांनी 21 एकर क्षेत्रात इस्राईल तंत्रज्ञानाचा वापर करत आपल्या शेतात 28 हजार विविध प्रजातीचे आंब्यांच्या रोपांची लागवड केली.
नंदुरबार : निसर्गाच्या लहरीपणामुळे (Kokan) कोकणात देखील (Mango Production) आंब्याचे उत्पादन घटले होते. शिवाय प्रतिकूल परस्थितीमुळे आंबा दरावरही परिणाम झाला होता. हंगामाच्या सुरवातीपासूनच आंबा फळबागांवर एक का अनेक प्रकारचे संकट ओढावल्याने प्रथमच कोकणातील आंबा उत्पादकही त्रस्त आहेत. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये मात्र, जिल्ह्यतील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील दत्तू मगन चौधरी या शेतकऱ्याने आपल्या 21 एकर क्षेत्रावर आमराई फुलवली आहे. शिवाय यामध्ये त्यांनी रासायनिक खताचा मारा न करता (Organic Farm) सेंद्रीय पध्दतीचा अवलंब केला आहे. त्यामुळे परराज्यातील व्यापाऱ्यांकडून थेट बांधावर येऊन आंब्याची खरेदी होत आहे.
प्रकाशाच्या शिवारात इस्राईल तंत्रज्ञानाचा वापर
पारंपरिक पध्दतीने फळबागांची लागवड केली तर उत्पादनात घट ही ठरलेलीच आहे. त्यामुळे पीक पध्दतीमध्येच नव्हे तर आता फळबागांमध्ये देखील बदल पाहवयास मिळत आहे. अधिकच्या उत्पादनाच्या दृष्टीने दत्तू चौधरी यांनी 21 एकर क्षेत्रात इस्राईल तंत्रज्ञानाचा वापर करत आपल्या शेतात 28 हजार विविध प्रजातीचे आंब्यांच्या रोपांची लागवड केली. केवळ लागवडच नाही तर सेंद्रीय शेती पध्दतीने या आंब्याची जोपासणाही त्यांनी केली आहे. त्यामुळेच तीन वर्षानंतर या बागेतून आंब्याच्या उत्पादनाला सुरवात झाली असून एक्सपोर्ट क्वालिटीचे आंबे मिळत आहेत. गुजरात राज्यातील व्यापाऱ्यांकडून बांधावर येऊन 100 रुपये किलोने खरेदी केली जात आहे.
100 रुपये किलोचा दर विविध जातीचे आंबे
निसर्गामुळे आंबा उत्पादनावर तर परिणाम झालाच आहे. पण दर्जाही खलावलेला आहे. असे असताना चौधरी यांनी सेंद्रीय शेती पध्दतीने आंब्याचे उत्पादन घेतल्याने दरही चांगला मिळला आहे. आंब्याला 100 रुपये किलो असा दर मिळत आहे. शिवाय याकरिता त्यांना बाजारपेठ जवळ करावी लागत नाही तर व्यापारीच थेट बांधावर येत आहेत. चौधरी यांच्या बागेत केसर, लंगडा,नीलम,बदाम, यासह विविध जातीच्या आंब्याची झाडे आहेत.
21 एकरामध्ये 15 लाखाचा खर्च
प्रकाशा येथील दत्तू चौधरी यांना 60 एक्कर जमिन आहे. यापैकी त्यांनी 21 एकरामध्ये आंब्याची बाग केली आहे. विविध जातीच्या आंब्याची जोपासणा करताना त्यांना आतापर्यंत 15 लाखाचा खर्च आला आहे.लागवड केल्यापासून अवघ्या तिसऱ्या वर्षापासून उत्पादनाला सुरवात झाली आहे. त्यामुळे केवळ दोन वर्षामध्ये झालेला खर्च परत मिळेल असा आशावाद चौधरी यांना आहे.