मुंबई : अतिवृष्टीमुळे खरिपातील (Kharif Season) पिकांचे नुकसान होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. पिक पाहणी, पंचनामे ही प्रक्रिया पूर्ण होऊन देखील नुकसानीचे दावे करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत भरपाई मिळालेली नाही. 1 ते 7 डिसेंबर हा राष्ट्रीय पीक विमा सप्ताह साजरा केला जात आहे. किमान या दरम्यानच्या काळात तरी (Crop Insurance Company) विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाई रक्कम अदा करणे अपेक्षित आहे. अन्यथा विमा कंपन्यांच्या कारभाराबाबत केंद्राकडे तक्रार केली जाणार असल्याचे सांगत राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांनी एक प्रकारे पीक विमा कंपन्यांना ‘अल्टीमेटम’ च दिले आहे.
अतिवृष्टीने खरिपातील पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर कृषी, महसूल आणि पीक विमा कंपन्यांच्या प्रतिनीधींनी पंचनामेही केले. त्यानुसार राज्यातील 21 लाख 93 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 416 कोटी रुपये देण्याचेही निश्चित झाले होते. मात्र, नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यास विमा कंपन्यांनी कायम टाळाटाळ केली आहे. काही विमा कंपन्यांनी तर एक रुपयाही शेतकऱ्यांना परतावा केलेला नाही. त्यामुळे या सप्ताहात का होईना रक्कम अदा केली जाईल असा विश्वास भुसे यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील 38 लाख 90 हजार शेतकऱ्यांनी नुकसानीचे दावे विमा कंपन्यांकडे केलेले आहेत. त्यापैकी सर्व शेतकऱ्यांच्या अर्जाचे सर्वेक्षण झाले असून 21 लाख 93 हजार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई ही निश्चित करण्यात आली आहे. यापोटी 601 कोटी 78 लाख रुपये हे विमा कंपन्यांनी वितरीत केले आहेत. मात्र, उर्वरीत रक्कम अदा करण्यासाठी काही विमा कंपन्यांनी आडमुठी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे वितरण हे रखडलेले आहे. पण यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप वाढत जात असून या राष्ट्रीय पीक विमा सप्ताहात जे नुकसानीचे दावे करण्यात आले आहेत ते तरी निकाली काढण्याच्या सुचना कृषिमंत्री भुसे यांनी दिल्या आहेत.
खरीप हंगामातील काही पिकांची अद्याप काढणी सुरु आहे. पीक कापणीनंतरच त्यांचा अहवाल हा कृषी विभागाकडे आणि विमा कंपन्यांकडे दिला जातो. त्यानुसार सरासरीच्या किती टक्के नुकसान झाले आहे याचा अहवाल तयार करुन झालेल्या नुकसानीची भरपाई देखील विमा कंपन्यांनाच द्यावी लागणार आहे. त्यामुळे आता विमा कंपन्यांची भूमिका महत्वाची आहे. कारण नुकसान होऊन दीड महिन्याचा कालावध लोटला तरी भरपाई ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही.
गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने पिकांसह फळबागाचे नुकसान झाले आहे. विशेषत: द्राक्षे आणि आंबा पिकांचा यामध्ये समावेश आहे. अद्यापपर्यंत किती नुकसान झाले हे सांगता येणार नाही पण आठवड्याभरात नुकसानीचा अहवाल तयार करण्याच्या सुचना कृषी विभागाला दिल्या असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले आहे.
रिलायन्स पीक विमा कंपनीने अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्याला नुकासानीचा परतावा दिलेला नाही. केंद्र सरकार आणि कंपनीमधील मतभेदामुळे हा पेच निर्माण झाला आहे. 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचा विमा या कंपनीने काढलेला आहे. मात्र, परताव्याबाबत आडमुठी भूमिका घेतल्याने रोष वाढत जात आहे. किमान आठवड्याभरात का होईना शेतकऱ्यांना पैसे अदा करणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा केंद्र सरकारकडे तक्रार केली जाणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.