Success Story : परदेशातील ‘ड्रॅगन फ्रुट’ आता हर्णसच्या खडकाळ शिवारात, प्रत्येक शेतकऱ्यास प्रोत्साहित करणारी हिरगुडे दाम्पत्यांची यशोगाथा
जिरायत म्हणजे केवळ पावसाच्या पाण्यावर घेतली जाणाऱ्या पिकाचे क्षेत्र. पण याच क्षेत्रावर आज नारायण हिरगुडे हे ड्रॅगन फ्रुटच्या माध्यमातून सोनं पिकवत आहेत. पारंपरिक भात शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून दर्जेदार अशा व्यापारी तत्त्वावर परदेशात घेतले जाणारे ड्रॅगन फळाचे पीक घेण्याचे धाडस करत वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पुणे : केल्याने होत आहे रे..आधी केलीची पाहिजे… या वाक्याला साजेल असेच कार्य भोर तालुक्यातील दुर्गम भागातील, हर्णस गावातल्या नारायण हिरगुडे आणि संगीता हिरगुडे ह्या शेतकरी जोडप्याने करुन दाखवलं आहे. काळाच्या ओघात (Farming) शेतीचे स्वरुप बदलत असले तरी शेतीमध्ये काय राम आहे? असे म्हणणारे पावलोपावली भेटतातच पण हिरगुडे दाम्पत्य याला अपवाद आहे. ज्या हर्णस तालुक्यातील शिवारात (Paddy Crop) भात शेती शिवाय इतर पिकांचा विचारही केला जात नव्हता त्या माळरानावर त्यांनी परदेशात ज्याचे उत्पादन घेतले त्या (Dragon Fruit) ‘ड्रॅगन फ्रुट’ चे उत्पादन घेतले आहे. 20 गुंठयात ड्रॅगन फ्रुटची शेती यशस्वी करून त्यांनी लाखोंच उप्तन्न मिळवले आहे. कष्टाला आधुनिकतेची जोड दिल्यावर काय होतं हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या या यशस्वी प्रयोगानंतर आता प्रगतीशील शेतकरीही पाहणी करुन याच पिकाचे अनुकरणही करु लागले आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला प्रोत्साहन मिळेल असाच त्यांचा प्रयोग असून यामध्ये आणखी वाढ करण्याचा त्यांचा मानस आहे.
लागवड ते बाजारपेठेचे योग्य नियोजन
ड्रॅगन फळझाड आणि फळांची वाढ 25 ते 35 अंश सेल्सिअस तापमानात होते. हिरगूडेंनी 20 गुंठ्यात गादी वाफ्यावर 10 बाय 6 फुटांवर एक हजार झाडे लावली. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला, एकदा पिक लावल्यानंतर पुढचे 20 ते 22 वर्ष सातत्याने मे ते डिसेंबर या कालावधीत सात ते आठ तोडे घेता येतात.एका तोड्याला 500 ते 600 किलो फळ मिळत. 400 ते 500 रु किलो या बाजारभावाने पुणे, वाशी, मुंबई मार्केट मध्ये भाव मिळतो. पीक लावल्यानंतर मे पासून पहिल्या तोड्यात त्यांना विक्रमी उत्पन्न मिळाले आहे.
ड्रॅगन फ्रुटचे असेही औषधी महत्व
ड्रॅगन फ्रुट फळझाड कोरपड, निवडुंग सारख्या काटेरी वनस्पती वेली प्रकारातील अतिशय उपयुक्त औषधी फळझाड आहे. फळ खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पांढऱ्या पेशीही वाढण्यास मदत होते.डेंग्यू आणि मलेरिया आजारात हे फळ खाल्ले जाते.हे फळ रस, शरबत, जाम, काढा,सिरप, आइस्क्रीम, योगर्ट, मुरंबा,जेली, कँडी पेस्ट्री ह्या गोष्टी बनविण्यासाठी वापरले जाते.कधी कधी फळाचा गर हा पिझ्झा किंवा वाईन तयार करण्यासाठी देखील केला जातो.या फळापासुन विटामीन सी,बी,कॅल्शियम, पोटॅशियम,लोह,फायबर प्रोटीनयुक्त अशी जीवनसत्वे मिळतात. 90% पाणी असलेल्या या फळाने डायबेटीज,हृदयविकार ,कॅन्सर, पोटाचे आजार ,कोलेस्ट्रॉल नियंत्रण, लठ्ठपणा आणि चरबी कमी होण्यास मदत होते.
जिरायत शेतीमध्ये पिकतंय सोनं
जिरायत म्हणजे केवळ पावसाच्या पाण्यावर घेतली जाणाऱ्या पिकाचे क्षेत्र. पण याच क्षेत्रावर आज नारायण हिरगुडे हे ड्रॅगन फ्रुटच्या माध्यमातून सोनं पिकवत आहेत. पारंपरिक भात शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून दर्जेदार अशा व्यापारी तत्त्वावर परदेशात घेतले जाणारे ड्रॅगन फळाचे पीक घेण्याचे धाडस करत वेगळी ओळख निर्माण केली आहे.भात शेती असलेल्या जिरायती शेतीतील 20 गुंठे क्षेत्रात त्यांनी ह्याची लागवड केली. या दाम्पत्यांनी ड्रगन फळ लागवड हा नवीन प्रयोग करून अलौकिक उपक्रम केला आहे.
20 गुंठ्याचा प्लॉट नव्हे पर्यटन स्थळच
हिरगुडे यांनी 20 गुंठ्यामध्ये हे प्रयोग केला असला तरी त्याचा नावलौकीक सबंध जिल्ह्यात झाला आहे. त्यामुळे तरुण आणि प्रगतशील शेतकरीही त्यांचा हा अनोखा प्रयोग पाहण्यासाठी येत आहेत. शिवाय शेतकऱ्यांनीही असे प्रयोग करावेत यासाठी नारायण हिरगुडे हे त्यांना मार्गदर्शन व सर्व माहिती देत आहे. त्यांचा हा एक प्रयोग अनेक शेतकऱ्यांचे जीवनमान बदलून टाकणारा ठरणार आहे.