Onion Crop : पारा घसरला अन् शेतकऱ्यांची धाकधूक वाढली, मुख्य आगारात कांद्याची काय स्थिती?
तापमानात वाढ झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. पण पुन्हा थंडीत वाढ झाल्याने पिकांवर धुक्याची चादर पसरली असून थंडीचा कडाका वाढलेला आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांच्या चिंतेत भर पडली आहे. कारण या धुईमुळे कांद्यावर करपा आणि माव्याचा प्रादुर्भाव वाढत आहे.
लासलगाव : हंगाम खरीप असो की रब्बी कांद्याच्या मुख्य आगारात लागवड क्षेत्र वाढणार हे निश्चित मानले जाते. त्याच अनुशंगाने यंदाही (Summer Season) उन्हाळी हंगामात (Onion Cultivation ) कांदा लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. उत्पादन वाढीच्या अनुशंगाने शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रयोग हे सुरुच असतात. यंदा मात्र, निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. मध्यंतरी उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींमुळे निफाडचा पारा हा 3 ते 5 अंशापर्यंत गेला होता. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना थेट बागांमध्येच शेकोट्या पेटवाव्या लागल्या होत्या तर कांदा पिकावरही धुके पसरले होते. मात्र, त्यानंतर आता कुठे तापमानात वाढ झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. पण पुन्हा (Decrease in temperature) थंडीत वाढ झाल्याने पिकांवर धुक्याची चादर पसरली असून थंडीचा कडाका वाढलेला आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांच्या चिंतेत भर पडली आहे. कारण या धुईमुळे कांद्यावर करपा आणि माव्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. दरातील चढ-उतारामुळे कांदा पीक हे लहरी मानले जाते पण याच पिकाला आता निसर्गाच्या लहरीपणाला सामोरे जावे लागत आहेत.
शेतकऱ्यांसाठी काय आहे सल्ला?
थंडी आणि धुक्यामुळे कांद्याच्या पिकावर परिणाम होत मावा, करपा आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो यामुळे खते औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागतो. उत्पादनखर्चात ही वाढ होते तसेच धुक्यामुळे दवबिंदू मोठ्या प्रमाणात कांद्याच्या पातीवर राहिल्यास पात खराब होऊन पांढऱ्या मुळ्याची वाढ खुटते. यामुळे उत्पादनामध्ये मोठी घट येते यावर उपाययोजना करण्यासाठी सकाळच्या वेळी कोरडा कपडा पातीवरुन फिरून दवबिंदू चा निचारा केल्यास पात खराब होत नाही. त्याचा कांद्याच्या उत्पन्नामध्ये चा फायदा होत असल्याचे या क्षेत्रातील तज्ञ शेतकरी निवृत्ती न्याहारकर सांगत आहे
तापमानात चढ-उतार, पिकांना धोका
गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याने रब्बी हंगामातील पिकांची वाढ जोमात होत होती. त्यामुळे उत्पादनावरही परिणाम होणार असल्याची चर्चा सुरु असतानाच पुन्हा थंडीचा कडाका सुरु झाला आहे. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रावर तापमानात घट झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे पिकांवरील धोका वाढला आहे. विशेषत: कांद्यावर करपा आणि मावा रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. तर द्राक्ष तोडणी अंतिम टप्प्यात असल्याने नुकसान टळले आहे. रब्बी हंगामातील पिकांना थंडी तशी पोषक मानली जाते मात्र, त्याचा अतिरेक झाला की पिकांवरही परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता कायम आहे.
पुन्हा शेकोट्या पेटल्या
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही निफाड तालुक्यात पारा घसरला होता. 3 ते 5 अंशावर तापमान घसरल्याने नागरिकांना शेकोट्याचा आधार घ्यावा लागला होता. एवढेच नाही तर द्राक्षांना तडे जाऊ नये म्हणून बागांमध्ये शेकोट्या पेटवून उबदार वातावऱण तयार करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला होता. आता महिन्याभरानंतर पुन्हा तीच परस्थिती ओढावली आहे. काही भागातील द्राक्ष तोड झाली आहे पण थंडीपासून बचावासाठी निफाड परिसरात शेकोट्या पेटू लागल्या आहेत.
संबंधित बातम्या :
शेतकऱ्यांची मंदीत-संधी, जे मुख्य पिकांतून मिळाले नाही ते हंगामी पिकांतून पदरी पडणार का?