केळीची रोपं उन्हानं करपू नये म्हणून शेतकऱ्यांचा नवा जुगाड, या पीकाचा आसरा…
शेतीत नवनवीन प्रयोग करून जमिनीसाठी पोषक असलेल्या आणि उन्हापासून रक्षणासाठीही महत्त्वाचे असलेल्या अशा दुहेरी फायद्याच्या ताग लागवडीचा प्रयोग जिल्ह्यात होत असल्याने शेतकऱ्यांच्या संशोधनशीलता यातून समोर येत आहे.
जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : एप्रिल आणि मे महिन्यात केळीची लागवड (Banana Cultivation) उत्तर महाराष्ट्रात (maharashtra) मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र यावर्षी तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअस पर्यंत गेल्याने नवीन लागवड केलेल्या केळीच्या रोपांमध्ये मरचे प्रमाण अधिक असल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे. मात्र नंदुरबार (nandurbar farmer) तालुक्यातील कोरीट येथील जगदीश पाटील या शेतकऱ्याने केळीच्या उन्हापासून बचाव आणि नंतर त्याचाच खत म्हणून उपयोग या दुहेरी गोष्टी लक्षात घेऊन केळी रोपांच्या आजूबाजूला ताग (सन) लागवड केली आहे. त्याचा फायदा मे महिन्यातील उन्हात किती होतोय हे पाहावं लागणार आहे. अशा पद्धतीने जुगाड केल्याशिवाय शेतातली पीकं चांगली येणार नाहीत एवढं मात्र निश्चित.
केळीच्या रोपाच्या आजूबाजूला तागाची लागवड
नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअस पर्यंत गेलाय, या वाढत्या तापमानाचा फटका नवीन लागवड केलेल्या केळीला बसत असल्याचे चित्र आहे. नवीन लागवड केलेल्या केळी बागांमध्ये मरचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. यावर केळीचे उन्हापासून संरक्षण आणि हिरवळीचे खत म्हणून केळीच्या रोपाच्या आजूबाजूला तागाची लागवड केली असून यातून शेतकऱ्याला सेंद्रिय खत आणि केळीचे उन्हापासून रक्षण असे दोन्ही बाबींचा फायदा होत आहे अशी माहिती शेतकरी जगदीश पाटील यांनी दिली.
एक लाख रुपये खर्च
आपल्या शेतात केळी लागवड करण्यापूर्वी दहा दिवसापूर्वी जगदीश पाटील यांनी सन (तागाची) लागवड केली असून, ज्या ठिकाणी सन लागवड केली आहे. त्या ठिकाणी रोपांच्या मरचे प्रमाण कमी असून यातून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान कमी होत आहे. केळी आणि सण लागवडीला आतापर्यंत एक लाख रुपये खर्च झाल्याचे शेतकरी जगदीश पाटील यांनी सांगितले.
शेतीत नवनवीन प्रयोग करून जमिनीसाठी पोषक असलेल्या आणि उन्हापासून रक्षणासाठीही महत्त्वाचे असलेल्या अशा दुहेरी फायद्याच्या ताग लागवडीचा प्रयोग जिल्ह्यात होत असल्याने शेतकऱ्यांच्या संशोधनशीलता यातून समोर येत आहे. अवकाळी पावसाने झोडपून काढल्यानंतर आता नेमकं काय करावं अशी स्थिती शेतकऱ्यांची होती. त्यानंतर आता कडक उन्हाळा असल्यामुळे पावसातून बचावलेली पीकं करपू लागली आहेत.