मुंबई : वाढत्या (Summer) उन्हाच्या झळा असो की अवकाळी पाऊस असो प्रमाणापेक्षा अधिक झाल्यावर काय होते याचा प्रत्यय यंदाच्या खरिपापासून ते रब्बी हंगाम आणि आता भाजीपाल्यावरही जाणवू लागला आहे. वाढत्या उन्हामुळे (Vegetable Production) भाजीपाला उत्पादनावर परिणाम होत आहे. यामुळे राज्यातील (Market) मुख्य बाजारपेठांमध्ये भाजीपाल्याची आवक घटली आहे तर दरामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. विशेषत: पालेभाज्यांवर याचा परिणाम झाला आहे. मुंबई येथील किरकोळ बाजारपेठेत फरसबी, घेवडा, पालक, वटाण्याचे दरांनी शंभरी पार केली आहे. शिवाय याच प्रमाणात आवक राहिली तर दरामध्ये अणखी वाढ होणार असल्याचे संकेत व्यापाऱ्यांनी दिले आहेत. केवळ मुंबईमध्येच नाही तर राज्यातील इतरत्रही भाजीपाला दराची अशीच अवस्था आहे.
शेतीमालाची आवक घटली की दर वाढणार आणि आवक वाढली तर दरात घट हा बाजारपेठेचा नियमच आहे. गतमहिन्यात मुंबई मार्केटमध्ये दिवसाकाठी 650 वाहनांमधून जवळपास 3 हजार टन भाजीपाल्याची आवक होत होती तर 12 एप्रिल रोजी 579 वाहनांमधून 2 हजार 500 टन आवक झाली आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने भाजीपाल्याचे दर वाढत आहेत. फरसबीचे दर हे 25 ते 35 रुपयांवरुन थेट 40 ते 90 रुपये किलोवर पोहचले आहेत. तर किरकोळ मार्केटमध्ये हेच दर 110 ते 120 रुपये किलो असे आहेत.
आवक घटून दर वाढले तरी याचा थेट फायदा हा शेतकऱ्यांनाच होतो असे नाही. कारण ठोक बाजारापेक्षा किरकोळ मार्केटमध्ये दुपटीन दर वाढलेले आहेत. फरसबी ठोक बाजारात 40 ते 90 रुपये किलो असली तरी किरकोळमध्ये मात्र 110 ते 120 पर्यंत विकली जात आहे. गाजर ठोकमध्ये 20 ते 30 रुपये तर किरकोळ बाजारात 60 रुपये, घेवडा ठोकमध्ये 40 ते 60 तर किरकोळमध्ये 100 रुपये, बीट ठोकमध्ये 14 ते 16 तर किरकोळमध्ये 60 रुपयाला विकले जात आहे. त्यामुळे आवक घटली असली तरी त्याचा अधिकचा फायदा मध्यस्ती असलेले व्यापारी आणि किरकोळ विक्रत्यांनाच होत आहे.
उन्हाळी हंगामातील सर्व पीके ही उपलब्ध पाणीसाठ्यावरच अवलंबून असतात. शिवाय सरासरीपेक्षा अधिकाच पाऊस झाल्याने जलस्त्रोत हे तुडुंब भरलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल तर केलाच पण भाजीपाल्यातून उत्पन्न मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र, गेल्या 15 दिवसांपासून उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. त्यामुळे पाणीपातळीत झपाट्याने घट होत असून ऐन गरजेच्या वेळी भाजीपाल्याला पाणीपुरवठा होऊ शकत नाही. त्यामुळे भाजीपाला उत्पादनात मोठी घट दिसून येत आहे.
Summer Crop : उन्हाळी सोयाबीनचा शेवटचा महिना, योग्य व्यवस्थापनामुळे उत्पादनात होईल वाढ
Sindhudurg : वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर नव्या प्रजातीचे कासव, नावावरुन एकवटले कासवप्रेमी!