Unseasonal Rain : या जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे घरांचे नुकसान, शेतकरी दुहेरी संकटात
धाराशिव जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील कर्नाटक सीमेवरील जगदाळवाडी येथे काल तुफान गारपीठ झाली. या गारा इतक्या मोठ्या होत्या की २५ ते ३० वर्षात असा पाऊस झाला नसल्याचे नागरीक सांगत आहेत.
संतोष जाधव, धाराशिव : धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात गारपीठ व अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) पिकासह घरांचे नुकसान झाले असुन उमरगा तालुक्यातील जगदाळवाडी गारपीठीने शेतकरी हैराण झाले आहेत. सरकारने पंचनामे करुन मदत करावी अशी आर्त हाक गावकऱ्यांनी दिली आहे. मागच्या आठदिवसांपासून राज्यात भयानक स्थिती आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे रबी हंगामातील (Rabi Seoson) पीकं आणि शेतीच्या बागांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी शेतीचं पंचनामे झाले आहेत. परंतु काही ठिकाणी अद्याप पंचनामे झाले नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
१२ तासानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी
धाराशिव जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील कर्नाटक सीमेवरील जगदाळवाडी येथे काल तुफान गारपीठ झाली. या गारा इतक्या मोठ्या होत्या की २५ ते ३० वर्षात असा पाऊस झाला नसल्याचे नागरीक सांगत आहेत. या पावसात पानमळे , ज्वारी, गव्हू, हरभरा, कांदा यासह घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. दोन राज्याच्या सीमेवर असल्या या गावात शेतकरी अडचणीत सापडला आहे. १२ तासानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यातुन होत आहे.
वीज पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मृत्यू झाले
धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्यात असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले होते. तरी सुद्धा काही ठिकाणी पंचनामे झाले नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. मागच्या आठ दिवसात पावसाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. वीज पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मृत्यू झाले आहेत.