वादळी वाऱ्याचा भाजीपाला पिकाला फटका, वीज पडून इतके शेतकरी दगावले; किती हेक्टरचे नुकसान?
सर्वात मोठे नुकसान झाले ते भाजीपाला पिकाचे. वीज पडून शेतकरी दगावल्याची माहिती आहे. हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले.
भंडारा : भंडारा-गोंदिया जिल्ह्यात वादळी पावसाचा चांगलाच फटका बसला. यात सर्वात मोठे नुकसान झाले ते भाजीपाला पिकाचे. वीज पडून शेतकरी दगावल्याची माहिती आहे. हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले. सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. त्यामुळे आता उद्यापासून नुकसानीचे पंचनामे सुरू होणार काय, असा सवाल शेतकरी विचारत आहेत. पंचनामे करून त्वरित मदत द्यावी. पंचनामे सुरू करण्यासाठी आणखी किती दिवस लागणार, असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे.
सात जनावरांचा मृत्यू
भंडारा जिल्ह्यात गारपिठीसह वादळी वाऱ्यासोबात आलेल्या पावसाने जिल्ह्यात थैमान घातले. 80 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. 7 जनावरांचा मृत्यू वीज पडल्याने झाला. तसेच 2 शेतकरी दगावले. 3 घरांचे नुकसान झाले. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार भंडारा जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस बरसला आहे.
टमाटर जमीनदोस्त
या पावसाचा फटका भाजीपाला पिकांना बसला आहे. टमाटर शेतीला या गारपिटीचा मोठा फटका बसला. टमाटर गळून पडले आहेत. तोडणीला आलेला टमाटर जमीनदोस्त झाले आहेत. आधीच टमाटरला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाले. आता गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
गडचिरोलीत मिरचीचे मोठे नुकसान
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव जिल्ह्यातील तब्बल 32 गावे बाधित झाली आहेत. तर, गडचिरोली जिल्ह्यात गारपीट अवकाळी पावसामुळे हातात आलेले मिरची पिकाचे खुप मोठे नुकसान झाले. गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागत मोठ्या प्रमाणात मिरचीच्या उत्पादन शेतकरी घेत असतात. दुसरी तोडणी होण्याआधीच अवकाळी पाऊस आणि गारपीट पडल्यामुळे शेतात ठेवलेली मिरचीचे खूप नुकसान झाले.
पंचनामे सुरू होणार का?
गडचिरोली जिल्ह्यात 238.5 हेक्टर जमिनीचे नुकसान गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झाले. अनेक विभागाचे कर्मचारी जुनी पेन्शनचे आंदोलन असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात अद्याप सर्वे किंवा पंचनामे सुरुवात झाले नाहीत. आज संप मिटला उद्यापासून पंचनामे सुरू होतात का हे पाहावं लागेल.
सर्वात मोठे नुकसान भाजीपाला पिकाचे झाले आहे. टमाटरचा खच पडला. गारपिटीने टमाटरचा लाल सडा पडलेला दिसला. त्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले.