Turmeric : कांद्यानंतर हळदीच्या खरेदीतही शेतकऱ्यांची फसवणूक, शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी..!
शेतीमाल खरेदी-विक्रीतून शेतकऱ्यांच्या फसवणूकीच्या घटना ह्या वाढत आहेत. मध्यंतरी सोलापुरात कांदा खरेदीमध्ये तर त्यानंतर नाशिकमध्ये द्राक्ष खरेदीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्या व्यापाऱ्याकडे बाजार समितीचा परवाना आहे, शिवाय ज्यांच्याकडून पावती मिळेल, तसेच पावतीवर खरेदीदाराचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर, पॅक हाऊस पत्ता, पॅन नंबर, परवाना क्रमांक याची माहिती शेतकऱ्यांनी ठेवणे गरजेच आहे.
सांगली : मध्यंतरी कांदा विक्रीत शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची घटना सोलापूर बाजार समितीमध्ये घडली होती. त्यानंतर आता (Sangli Market) सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Turmeric Crop) हळदीच्या व्यवहारामध्ये 10 शेतकऱ्यांची एका (Traders) व्यापाऱ्याने फसवणूक केल्याची घटना घडली आहे. बाजारभावापेक्षा 1 हजार रुपये अधिकचा दर देण्याचे आश्वासन व्यापारी एस.बी.पाटील यांनी बावची येथील शेतकऱ्यांना दिले होते. व्यापाऱ्याने हळदीची खरेदी तर केली पण त्या बदल्यात दिलेले धनादेश हे वटलेच नाहीत. काही शेतकऱ्यांना उचल म्हणून दिली तेवढीच रक्कम शेतकऱ्यांच्या पदरी पडली. पण यामध्ये 12 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे बाजार समिती आता काय भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे.
नेमकी फसवणूक झाली कशी?
सध्या हळदीची आवक बाजार समितीमध्ये वाढलेली आहे. त्यामुळे 9 हजार ते 9 हजार 500 असा प्रति क्विंटला दर मिळत आहे. मात्र, चालू बाजारभावापेक्षा हळदीला 1 हजार रुपये वाढवून देतो असे म्हणत सांगलीचे व्यापारी एस.बी. पाटील यांनी शेतकऱ्याचे शेतच जवळ केले. असे आश्वासन देत त्यांनी सुरवातीच्या खरेदीचे पूर्ण पैसे शेतकऱ्यांना देऊन त्यांचा विश्वास संपादन केला होता. मात्र, त्यापुढच्या खरेदीला काही प्रमाणात उचल आणि पुढील तारखेचे धनादेश त्यांना दिले. मात्र, चेक हा बॅंकेत वटतच नाही तर पाटील हे फोनही उचलत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे पैसे मिळणार की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे.
व्यवहार करताना काय काळजी घ्यावी..!
शेतीमाल खरेदी-विक्रीतून शेतकऱ्यांच्या फसवणूकीच्या घटना ह्या वाढत आहेत. मध्यंतरी सोलापुरात कांदा खरेदीमध्ये तर त्यानंतर नाशिकमध्ये द्राक्ष खरेदीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्या व्यापाऱ्याकडे बाजार समितीचा परवाना आहे, शिवाय ज्यांच्याकडून पावती मिळेल, तसेच पावतीवर खरेदीदाराचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर, पॅक हाऊस पत्ता, पॅन नंबर, परवाना क्रमांक याची माहिती शेतकऱ्यांनी ठेवणे गरजेच आहे. शिवाय बाजार समितीच्या बाहेर व्यवहार न करता बाजार समितीच्या आवारातच खरेदी-विक्री करणे गरजेचे असल्याचे मत अॅड.रामनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
बाजार समितीचे आवाहन काय?
बाजार समिती कार्यक्षेत्रात असे व्यवहार होत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट शेतीमाल हा बाजारपेठेत आणावा. शिवाय परवानाधारक व्यापाऱ्यांकडेच शेतीमालाची विक्री करावी. अशा परवानाधारक व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार हा बाजार समिती प्रशासनला असतो.मात्र, मार्केट कमिटीबाहेर व्यवहार झाले तर मात्र मुश्किल होते मत बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.