Amravati : पॉकीट महाबीजचं अन् सोयाबीन बाजार समितीमधलं, खरिपाच्या तोंडावर राज्यमंत्री बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
एखाद्या मंत्र्याने जरी काम सांगितले आणि त्याबाबत अधिकारी नकारात्मक असेल तरी ते काम होऊ शकत नाही. अधिकाऱ्यांची भूमिका फार महत्वाची असून प्रशासन आणि शेतकरी यांच्यामधला तो दुआ असून त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना घेता आला पाहिजे असेही मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले.

अमरावती : (Kharif Season) खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे. शिवाय शेत शिवारापासून ते शहरापर्यंतच्या बाजारपेठेपर्यंत केवळ (Chemical & Seed) खत-बियाणे याचीच चर्चा सुरु असताना (Bachchu Kadu) राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. गतवर्षी बिजोत्पादन केलेले बियाणे संपल्यानंतर महाबीजने अक्षरश: बाजार समितीमधील बियाणे खरेदी केले आणि तेच बियाणे हे महाबीजचे असल्याचे सांगत विकले असा त्यांनी आरोप केल्यामुळे आता महाबीजचे बियाणे खरेदी करताना प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात संशयाची पाल चुकचुकणार हे मात्र नक्की. यंदा महाबीज कंपनीने सोयाबीन बियाणांच्या किंमती वाढवल्या आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
सबसिडीच्या नावाखाली लूट
बियाणे केवळ सबसिडीवर मिळते म्हणून शेतकऱ्यांचा त्याकडे कल असतो. ही सबसिडी म्हणजे एखादा वाईट मित्र मिळाला तर दारूची सवय लावते तशी सरकारने आम्हाला सबसिडी देऊन आमच्या मागे ही सवय लावून दिल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती हालाकीची असल्याने ही वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पण उत्पादन वाढीसाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदानाचा आधार काढावाच लागणार आहे. शिवाय शेतकऱ्यांनी गटाने जर बियाणे निर्मिती केली तर एक दिवस या कंपन्या बंद पडतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
शेती व्यवसायात अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची
शेती व्यवसायात शेतकऱ्यांना जर कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळाले तर शेती उत्पादनात वाढ तर होतेच पण शेतकऱ्यामध्ये एक विश्वास निर्माण होतो. एखाद्या मंत्र्याने जरी काम सांगितले आणि त्याबाबत अधिकारी नकारात्मक असेल तरी ते काम होऊ शकत नाही. अधिकाऱ्यांची भूमिका फार महत्वाची असून प्रशासन आणि शेतकरी यांच्यामधला तो दुआ असून त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना घेता आला पाहिजे असेही मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले.




बियाणे निर्मितीसाठी शेतीगट महत्वाचे
बियाणे निर्मितीचा आव आणून काही कंपन्या ह्या केवळ हंगामात कोट्यावधी रुपये कमावतात. त्यामुळे शेतकऱ्यांनीच बिजोत्पादन कार्यक्रमाचे ज्ञान घेऊ शेतकरी गट करुन त्याची विक्री केली तर उत्पाादनात वाढ होणार आहे. शिवाय कंपन्यांच्या मनमानी कारभारातून सुटाकाही होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येत गटशेतीवर लक्ष केंद्रीत करावे असेही आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.