तो रस्त्यात जोर जोरात ओरडत होता, फुकट घ्या फुकट घ्या…पण त्याच्या डोळ्यात पाणी असतांनाही कुणाला…
नाशिकच्या मनमाड येथील एका शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. शेतमाल व्यापारी खरेदी करत नसल्याने शेतकऱ्याने फुकट कोथिंबीर वाटली आहे.
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी ( Farmer Loss ) मेटाकुटीला आला आहे. त्यामध्ये भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी भाजीपाला फुकट वाटत असल्याचे दिसून येत आहे. नाशिकच्या पेठरोड येथील बाजार समितीत 1 रुपयाला कोथिंबीर जुडीचा मिळत असल्याने व्यापऱ्याला न देता रस्त्यावर येऊन फुकट वाटप केल्याचे समोर आले होते. त्यावरून बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे हे सांगण्यासाठी दृश्य पुरेसे होते. अशातच मनमाडमधील ( Manmad News ) एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून फुकट घेणाऱ्या नागरिकांना जराही कीव येत नाही का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मनमाड बाजार समितीत नेहमीप्रमाणे दिलीप सांगळे हे शेतकरी कोथिंबीर घेऊन विक्रीसाठी दाखल झाले होते. मात्र बरेच तास उलटून गेले तरी व्यापऱ्याने सांगळे यांची कोथिंबीर खरेदी केली नाही. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्याने सर्व कोथिंबीर परत गाडीत भरून रस्त्यावर आणली.
रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना दिलीप सांगळे यांनी फुकट वाटली. यावेळेला अनेक नागरिकांनी ती हसत हसत घेत निघून गेले. मात्र, हजारो रुपये खर्च करून पिकवलेली कोथिंबीर फुकट वाटण्याची वेळ आल्याने दिलीप सांगळे यांच्या डोळ्यात पाणी होते.
दिलीप सांगळे यांच्या डोळ्याचा कडा पाण्याने ओल्या झालेल्या असतांनाही कुणी त्यांच्या खिशात दहा वीस रुपये बळजबरीने घातले नाही. याचे त्यांना मोठं दु:ख आहे. पोटच्या पोरसारखं जपलेले पीक फुकट वाटण्याची वेळ आल्याने त्यांना मोठं दु:ख झाले होते.
डोळ्याच्या कडा पाण्याने ओल्या झालेल्या असतांना शेतकरी फुकट कोथिंबीर वाटतोय, आणि लोकं हसत हसत कोथिंबीर घेत आहे, थोडी सुद्धा कुणाला कीव आली नाही कि त्याच्या खिशात दहा वीस रुपये बळजबरीने टाकावे. पण लक्षात ठेवा तो राजामाणूस आहे. म्हणूनच त्याला बळीराजा म्हणतात.#manmad #farmer pic.twitter.com/tHedmIHnHQ
— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) March 9, 2023
विशेष बाब म्हणजे शेतकरी फुकट वाटतोय म्हणून लोकही फुकट घेत असल्याने कुणालाही शेतकऱ्याची कीव आली नाही, अनेकांनी तर फोटो सेशन करताय का ? म्हणत शेतकऱ्याला हिणवण्याचे कामही केले. त्यामुळे शेतकऱ्याच्या वाट्याला आलेले दु:ख मन सुन्न करणारे आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्याच्या शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट असतांना मोठ्या धिटाईने तो संकटाला सामोरे जात आहे. फुकट भाजी वाटत असतांनाही नागरिक त्याची चेष्टा करत असल्याने त्याचे मोठं दु:ख आहे.
कितीही मोठं संकट आले तरी बळीराजा डगमगत नाही. मोठ्या धिटाईने तो पुन्हा उभा राहत असतो. स्वतः आर्थिक अडचणीत असतांनाही तो जनतेला फुकट वाटण्याची हिम्मत ठेवतो म्हणूनच त्याला संपूर्ण जग बळीराजा म्हणत असते.
मनमाड येथील व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून बळीराजाला पुन्हा धीर देण्यासाठी नागरिकांनी मदत करू नका पण त्याची चेष्टा करू नका असं बोललं जात आहे.