Beed : परळीकरांची चाढ्यावर मूठ, पेरणीबरोबर नवे संकटही ओढावले शेतकऱ्यांनी, वाचा सविस्तर
खरीप हंगामातील पिके ही पावसावरच अवलंबून आहेत. सध्या बरसलेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा असला तरी ही ओल पेरणीसाठी पोषक नाही. दोन दिवसांपूर्वी परळी तालुक्यातील सावरगांव, मांडवा आणि धर्मापूरी या परिसरात पावसाने हजेरी लावलेली आहे. मात्र, हा पाऊस स्थिरावलेला नाही. दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा उघडीप झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करुन नये असा सल्ला कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांनी दिला आहे.
परळी : (Marathwada) मराठवाड्यात आता कुठे ढगाळ वातावरण निर्माण होऊ लागले आहे . या विभागातील बीड, जालना जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसानेही हजेरीही लावलेली आहे. मात्र, हा पाऊस काही (Sowing) पेरणीयोग्य बरसलेला नाही. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामध्ये 49 मिमी पावसाची नोंद झाली आहे. असे असतानाही सावरगाव, मांडवा, धर्मापुरी या भागातील शेतकऱ्यांनी (Kharif Season) खरिपाच्या पेरणीला सुरवात केली आहे. शेतकऱ्यांच्या या गडबडीमुळेच दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. अजूनही जिल्ह्यात अनिश्चित अशा स्वरुपाचाच पाऊस बरसत आहे. शिवाय खरिपातील पिकांना पाण्याची गरज असते अशा परस्थितीमध्ये पावसाने ओढ दिली तर अधिकचे नुकसानच होणार हे निश्चित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिमी पावसाची नोंद झाल्याशिवाय पेरणी करु नये असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
अन्यथा दुबार पेरणीचे संकट..
खरीप हंगामातील पिके ही पावसावरच अवलंबून आहेत. सध्या बरसलेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा असला तरी ही ओल पेरणीसाठी पोषक नाही. दोन दिवसांपूर्वी परळी तालुक्यातील सावरगांव, मांडवा आणि धर्मापूरी या परिसरात पावसाने हजेरी लावलेली आहे. मात्र, हा पाऊस स्थिरावलेला नाही. दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा उघडीप झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करुन नये असा सल्ला कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांनी दिला आहे. पुरेशी ओल नसल्याने पिकांची वाढ होणार नाही परिणामी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही
पीक पेरणीपूर्वीच मशागत आणि बी-बियाणे व रासायनिक खतासाठी शेतकऱ्यांना अधिकचे पैसो मोजावे लागले आहेत. वाढती महागाई आणि यंदा खताचा मर्यादित झालेला पुरवठा यामुळे मशागतीच्या कामापासून ते बियाणांपर्यंत सर्वकाही महागले आहे. तर दुसरीकडे शेतीमालाचे दर तर घसरत आहेतच पण उत्पादनाचीही शाश्वती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता अपेक्षित पावसाची वाट पाहणे महत्वाचे आहे. अन्यथा तेलही गेले अन् तूपही अशी अवस्था होण्याचा धोका आहे.
पेरणीची स्थिती काय आहे?
मराठवाड्यात खरीप हंगामात सोयाबीन हे मुख्य पीक आहे. पण गतवर्षी कापसाला मिळालेला विक्रमी दर अन् सध्याची मागणी लक्षात घेता परळी तालुक्यात पुन्हा पांढऱ्या सोन्याच्या क्षेत्रात वाढ होईल असा अंदाज आहे. असे असले तरी सोयाबीन अव्वल स्थानी राहणार यात शंका नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. तर तालुक्यातील एका मंडळाचे क्षेत्र सोडता उर्वरित क्षेत्रावर पेरण्या झालेल्या नाहीत.