या मागण्यांसाठी शेतकरी उतरले रस्त्यावर; कापूस, सोयाबीन, तूर उत्पादकांनी केली ही मागणी
ही लढाई लढायची असेल तर गावागावात गेले पाहिजे. काही लोकांना वैचारिकदृष्ट्या प्रशिक्षित करावं लागेल, असं आवाहन शेतकरी नेत्यांनी केलं.
यवतमाळ : शेतकरी (Farmers) नेहमीच संकटात असतो. कधी असमानी तर कधी सुलतानी याचा सामना करावा लागतो. सध्याची शेतमालाची परिस्थिती बघता कापसाला गेल्या वर्षाच्या तुलनेत फारच कमी भाव आहे. अशीच परिस्थिती सोयाबीन (Soybeans) आणि इतर शेतमालाची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एक दिवसीय ठिय्या आंदोलन केले. आपल्या मागण्या सरकार दरबारी मांडल्या. कापसाचे (Cotton)भाव कापले, कोणीच नाही आपले. सरकारने शेतीमाल भाववाढीचे मार्ग प्रशस्त करून द्यावेत. यासह अन्य काही मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले. त्यांनी जय जवान जय जवानच्या घोषणा देत शेतमालाला हमीभाव मिळावे, अशी मागणी केली. यासाठी भूमिपुत्र ठिय्या आंदोलन करण्यात आले.
शेतमालाचा सरकारी हमीदर निश्चित करावा. त्यासाठी अनेक प्रकारचे शेतीखर्च गृहित धरावे. हे हमीदर बाजाराचे तुलनेत अत्यल्प असू नये. अशा काही मागण्या यावेळी शेतकऱ्यांनी केल्या.
हमीभाव जाहीर करावा
सरकारने हे हमीदर निश्चित करण्याकरिता कृषी हमीभाव दर निर्धारण समितीचे पुनर्गठन करावे. सर्व बारीक सारीक शेती खर्च गृहित धरावा. त्यानंतर हमीभाव जाहीर करावा. अशी आग्रही मागणी आजच्या भूमिपुत्र एल्गार संघर्ष समितीच्या ठिय्या आंदोलनात करण्यात आली.
शेतमालावरील सर्व नियंत्रणे उदा.आयात, निर्यात, वायदेबाजार, स्टाक होल्डिंग इत्यादी संपुष्टात आणावेत. चढ्या बाजारभावाचा फायदा शेतकऱ्यांना कायम मिळू द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन
या आंदोलनाचे नेतृत्व महेश पवार, रितेश बोबडे या तरुण कार्यकर्त्यांनी केले. यावेळी शेतकरी संघटनेचे अभ्यासू कार्यकर्ते अमरावतीचे संजय कोल्हे उपस्थित होते. कोल्हे यांनी आपल्या भाषणातून शेतकऱ्यांच्या समस्या आणि शासनाची उदासीनता मांडली. शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले.
आयातीवर निर्बंध लावावा
कापूस, तूर, सोयाबीनला योग्य हमीभाव द्यावा. कापूस, सोयाबीन निर्यात खुली करावी. कापूस व इतर शेतमालाच्या आयातीवर निर्बंध ठेवावा. कृषी पंपाला दिवसा वीज देण्यात यावी. जंगली जनावरापासून शेतीला संरक्षण द्यावे, या मागण्या शासनदरबारी मांडण्यात आल्या.
याशिवाय उर्वरित पीक विमा सरसकट देण्यात यावा. तांत्रिक बाबीमुळे राहिलेल्यांना कर्जमाफी देण्यात यावी, पीएम किसान योजनेमध्ये वंचित शेतकऱ्यांना लाभ मिळावा. पोखरा योजनेची अंमलबजावणी शंभर टक्के करावी. नियमित सानुग्रह शेतकरी अनुदान त्वरित वाटप करावा. इत्यादी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ घाटंजीने शेतकरी भजन गायिली.
शेतीमालाची लढाई काही सोपी नाही. ही लढाई लढायची असेल तर गावागावात गेले पाहिजे. काही लोकांना वैचारिकदृष्ट्या प्रशिक्षित करावं लागेल, असं आवाहन शेतकरी नेत्यांनी केलं.