Positive News : हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला, गोंदियात वरुणराजा धो-धो बरसला, शेत-शिवारात लगबग
विदर्भात तीन दिवसांपूर्वीच मान्सूनचे आगमन झाले होते. शिवाय गोंदिया जिल्ह्यातूनच आगमन झाले असतानाही अपेक्षित पाऊस झाला नव्हता. मात्र, आठवड्याच्या शेवटी विदर्भात मध्यम ते मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. अखेर रविवारची सुरवात धुवांधार पावसाने झाली आहे.
गोंदिया : (Vidarbha) विदर्भात तीन दिवसांपूर्वीच मान्सूनचे आगमन झाले आहे. असे असले तरी पेरणी योग्य पाऊस झाला नसल्याने (Kharif Season) खरीप हंगामावरील चिंतेचे ढग हे कायम होते. मात्र, रविवारची पहाट (Gondia) गोंदियाकरांसाठी दिलासादायक ठरली आहे. बळीराजा साखर झोपेत असतानाच वरुणराजाने अशी काय कृपादृष्टी केली आहे की सर्व शिवार पावसाने तृप्त झाला आहे. त्यामुळे एक उत्साह निर्माण झाला असून आता खरिपातील रखडलेल्या कामांना गती येणार आहे. खरीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झालेले शेतकऱ्यांचा पेरणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
20 दिवसांची प्रतीक्षा संपली, सातत्य गरजेचे
यंदा वेळेपूर्वी मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, अनिश्चित व अनियमित पावसाची वाट पाहण्यात 20 दिवस गेले आहेत. आता कुठे गोंदिया जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असून यामध्ये सातत्य राहिले लवकरच चित्र बदलेन असा विश्वास कृषी विभागाला आहे. असे असताना देखील शेतकऱ्यांनी जमिनीतील ओल पाहूनच खरीप पेरणी करणे गरजेचे आहे. 15 दिवस पेरण्या लांबणीवर गेल्या आहेत पण ओल नसताना चाढ्यावर मूठ ठेवली तर पेरणीचा उपयोग नाही. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊनच शेतकऱ्यांनी निर्णय घेणे गरजेचे आहे.
गोंदिया जिल्ह्यातूनच विदर्भात मान्सूनचे आगमन
विदर्भात तीन दिवसांपूर्वीच मान्सूनचे आगमन झाले होते. शिवाय गोंदिया जिल्ह्यातूनच आगमन झाले असतानाही अपेक्षित पाऊस झाला नव्हता. मात्र, आठवड्याच्या शेवटी विदर्भात मध्यम ते मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. अखेर रविवारची सुरवात धुवांधार पावसाने झाली आहे. त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामे तर होणारच आहेत पण ज्या मंडळात 75 ते 100 मिमी दरम्यान पाऊस झाला त्या ठिकाणी शेतकरी धान पिकाची पेरणी करणार आहेत.
धान पिकावरच शेतकऱ्यांचा भर
विदर्भात धान पीक हेच खरिपातील मुख्य पीक आहे. पावसाबरोबर साचलेल्या पाण्यातून उत्पादनात वाढ होते. शिवाय याच पिकांवर शेतकऱ्यांची मदार असते. रब्बी हंगमातील पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ झाली होती. आता खरीप हंगामातही सर्वकाही करुन उत्पादन वाढीवर भर दिला जाणार आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचा उत्साह तर वाढला आहेच पण अल्हादायक वातावरणामुळे नागरिकांना दिलासाही मिळणार आहे.