वाशिममधील खरबूज विक्रीसाठी थेट जम्मू काश्मीरला, शेतकऱ्याला लाखो रुपयाचा फायदा
मंत्री यांच्या शेतातून पहिल्या तोडणीत साधारण २० टनांचे खरबूज निघाले आहेत, तर आणखी १७ ते १८ टन उत्पादन पुन्हा मिळणार आहे. त्यांना सहा ते साडेसहा लाखांचे उत्पादन होणार आहे.
वाशिम : शेती (agricultural news) परवडत नाही अशी सगळीकडेच ओरड होत असताना, काही शेतकरी मात्र सेंद्रिय शेतीची कास धरत वेगवेगळे प्रयोग करून लाखोंचं उत्पन्न घेत आहेत. असाच प्रयोग वाशिमच्या राधेश्याम मंत्री यांनी केला आहे. त्यांनी आपल्या शेतात तीन एकर क्षेत्रावर लायलपुरी जातीच्या खरबुजची (water melon) लागवड केली. आज ८२ दिवसांनी या खरबुजची तोडणी होत आहे. पण मंत्री यांनी हे खरबूज स्थानिक बाजारात न विकता व्यापाऱ्याच्या मदतीनं थेट जम्मू काश्मीरला (jammu kashmir) पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून त्यांना थेट शेतातून १७ रुपये प्रतिकिलो एव्हडा दर मिळाला आहे. जर स्थानिक बाजारात विक्री केली असती, तर केवळ दहा ते बारा रुपये दर मिळाला असता.
ट्रक जम्मू काश्मीरला रवाना
मंत्री यांच्या शेतातून पहिल्या तोडणीत साधारण २० टनांचे खरबूज निघाले आहेत, तर आणखी १७ ते १८ टन उत्पादन पुन्हा मिळणार आहे. त्यांना सहा ते साडेसहा लाखांचे उत्पादन होणार आहे. आज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर टोतावार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून ट्रक जम्मू काश्मीरला रवाना करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सरकारचा सेंद्रिय शेती भूषण पुरस्कार
मंत्री यांनी याच शेतात रेड अँपल बोराचीही लागवड केली आहे. मात्र झाडं सध्या लहान असल्याने आंतरपीक म्हणून पावसाळ्यात सोयाबीन आणि आता खरबुजाचे उत्पादन घेतले आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही रासायनिक खतं किंव्हा कीटकनाशकांचा वापर करण्यात आला नाही, तर संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने खरबूज पिकविल्याने त्याची चवही अत्यंत गोड आहे. राधेश्याम मंत्री हे गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण सेंद्रिय शेती करत आहेत. त्यासाठी त्यांना २०१८ साली महाराष्ट्र सरकारचा सेंद्रिय शेती भूषण पुरस्कारही मिळाला आहे. मंत्री आपल्या शेतात नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतात, सुगंधी औषधी वनस्पती जिरेनियम लागवड, विक्रमी उत्पादन येणारे बेडवरील सोयाबीन, गोपालनातून संपूर्ण शेतीचे सेंद्रियकरण करून त्यांनी कमी खर्चात चांगले उत्पादन घेतले आहे. पारंपरिक पिकांना बगल देत बाजारात मागणी असलेल्या पिकांचे उत्पादन घेतले. त्याला नियोजनाची जोड देऊन योग्य बाजारपेठेत विक्री केली तर कमी कालावधीत चांगले उत्पन्न घेता येते हे राधेश्याम मंत्री यांनी दाखवून दिले आहे.