मुंबई : यंदा नियोजित वेळेपूर्वीच (Monsoon) मान्सूनचे आगमन होणार असल्याचा अंदाज (Meteorological Department) हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र, ऐन वेळी वाऱ्याची दिशा बदल्याने मान्सून पावसाने हुलकावणी दिली आहे. आता येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदा 1 जून नव्हे तर 29 मे रोजी (Kerala) केरळात मान्सूनचे आगमन झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले होते. त्यानुसार आतापर्यंत महाराष्ट्रात पावसाचे आगमन होणे अपेक्षित होतेय उलट आता वाढत्या उष्णतेमुळे राज्यातील काही भागामध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, 4 ते 5 दिवसांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवल्याने पुन्हा शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.
यंदा खरिपासाठी सर्वकाही पोषक वातावरण असल्याचे सांगण्यात आले होते. एवढेच नाही तर मान्सूचेही आगमन वेळेपूर्वीच होणार असल्याने शेतकऱ्यांनीही खरिपाचे नियोजन करीत खरीपपूर्व मशागतीची कामे आटोपून घेतली होती. असे असतानाही पावासाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. उलट गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे अनिश्चित आणि अनियमित असलेल्या मान्सूनच्या मनात तरी काय आहे असा सवाल उपस्थित होत आहे.
राज्यात आतापर्यंत तुरळक ठिकाणीच पावसाने हजेरी लावलेली आहे. सर्वच भागामध्ये समप्रमाणात पाऊस हा बरसलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात पेरणाी विषयी शंका उपस्थित झाली असून आतापर्यंतचा पाऊस पेरणीयोग्य तर नाहीच पण भविष्यात 100 मिमी पाऊस झाला तरच शेतकऱ्यांनी चाढ्यावर मुठ ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तुर्तास पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज असल्याने पुन्हा शेतकरी जोमाने तयारीला लागला आहे. रखडलेली कामे आटोपून पुन्हा मशागतीवर भर दिला जाणार आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मान्सून राज्यात बरसणे अपेक्षित होते. पण राज्यातील तुरळक ठिकाणी मध्यंतरी पावसाने हजेरी लावली होती. तो पाऊसही सध्या गायब झाला आहे. त्यामुळे हंगामपूर्व मशागतीची कामे आटोपून शेतकरी पेरणीच्या तयारीत आहे पण अपेक्षित पावासाची प्रतीक्षा प्रत्येकालाच लागून राहिली आहे. आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार 4 ते 5 दिवसांमध्ये पावसाने हजेरी लावली तरी देखील सर्वकाही वेळेत होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.