राज्यात वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार वाशीम जिल्ह्यात रात्री वाशीमसह कारंजा, मानोरा, रिसोड आणि तालुक्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे.
जळगाव : जळगाव (jalgaon) जिल्ह्यात अनेक भागात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाला (rain update) सुरुवात झाली असून वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रावेर यावल भुसावळ तालुक्यात केळी, गहू, मका पिकाला मोठा फटका बसला आहे. शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पीके ही आडवी झाली आहेत. ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने बळीराजा मात्र हवालदार झाला आहे. आज दिवसभरात अनेक जिल्ह्यात (maharashtra heavy rain update) पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
गहु, हरभरा पिकांसह संत्रा बागेचे अतोनात नुकसान
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार वाशीम जिल्ह्यात रात्री वाशीमसह कारंजा, मानोरा, रिसोड आणि तालुक्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बीतील काढणीला आलेल्या गहू, हरभरा, पिकांसह भाजीपाला आणि संत्रा बागेच अतोनात नुकसान झाले आहे. सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडीत झाला. दरम्यान अवेळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकाच नुकसान झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत आहे, यामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसत असून, पिके जमीनदोस्त होत आहेत. रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथील आत्माराम कापरे यांच्या अडीच एकरातील ज्वारीचे पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याने या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
हिंगोली जिल्ह्यात रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे व रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी पिकातून चार पैसे मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र रब्बीवरही अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचे संकट घोंगावत आहे. रात्री झालेल्या वाऱ्यामुळे गव्हाचे पीक जमीन दोस्त झाले आहे. त्याच बरोबर आंब्या सह फळबागांचे ही मोठे नुकसान झाले.