Bail Pola : प्रतिकूल परस्थितीमध्येही पोळा उत्साहात, राज्यभर बैल पोळ्याची परंपरा कायम..!
पोळा हा बैलांचा सण आहे. गेल्या अनेक दिवसांची परंपरा शेतकऱ्यांनी टिकवून ठेवली आहे. श्रावण महिन्याच्या अंतिम टप्प्यात किंवा भाद्रपद महिन्याच्या सुरवातीला हा उत्सव पार पडतो. वर्ष शेतामध्ये राबणाऱ्या आणि शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने सखा असणाऱ्या बैलजोडीच्या ऋणाईत हा सण साजरा केला जातो. पोळ्याच्या पूर्वसंध्येला खांदामळणी केली जाते. बैलांच्या खांद्यावर वर्षभर ओझे असते तो खांदा मळला जातो.
यवतमाळ : (Bail Pola) पोळा हा बैलाचा सण असला तरी यंदाच्या या सणात शेतकऱ्यांचा उत्साह मात्र जोमात होता. गेली दोन वर्ष या सणावरही (Corona) कोरोनाचे सावट होते. त्यामुळे बैलजोडीची ढोल ताशाच्या गजरात मिरणवूक तर सोडाच पण साधा (Decoration) साजश्रृंगारही केला गेला नव्हता. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे मात्र, नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांची पाठ ही सोडलेली नाही. खरीप हंगामातील पिकांचा पेरा होताच सुरु झालेले संकट अद्यापही कायम आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी या सर्व संकटाला बाजूला सारुन पोळा सण उत्साहात साजरा केला आहे. बैलजोडीच्या ऋणाईत हा सण साजरा केला जातो. काळाच्या ओघात शेतकऱ्यांचा यांत्रिकिकरणावर भर असला तरी आपली परंपरा जोपासत बैलजोडीच्या मिरवणुका उत्साहात पार तर पडल्याच पण विधीवत बैल आणि गायीचे लग्नही लावण्यात आले.
असा साजरा होतो पोळा सण..!
पोळा हा बैलांचा सण आहे. गेल्या अनेक दिवसांची परंपरा शेतकऱ्यांनी टिकवून ठेवली आहे. श्रावण महिन्याच्या अंतिम टप्प्यात किंवा भाद्रपद महिन्याच्या सुरवातीला हा उत्सव पार पडतो. वर्ष शेतामध्ये राबणाऱ्या आणि शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने सखा असणाऱ्या बैलजोडीच्या ऋणाईत हा सण साजरा केला जातो. पोळ्याच्या पूर्वसंध्येला खांदामळणी केली जाते. बैलांच्या खांद्यावर वर्षभर ओझे असते तो खांदा मळला जातो. शिवाय खांदामळणी आणि पोळ्या दिवशी बैलजोडी ही स्वच्छ धुतली जाते. एवढेच नाहीतर या दोन दिवसांमध्ये कोणतेही काम करुन घेतले जात नाही. पोळ्याच्या दिवशी त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. गाईबरोबर बैलांचे लग्न लावले जाते. यामध्ये वेगवेगळ्या मंगळआष्टीकाही असतात. गोड पुरणपोळी नैवद्य दाखवला जातो.
ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक
शेतकऱ्यांनी केवळ परंपराच टिकवली नाहीतर आपला उत्साह ही दाखवून दिला आहे. गेली दोन वर्ष कोरोनामुळे हा सण साजराही करता आलेला नव्हता. यंदा मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मोठ्या उत्साहात सण पार पडला आहे. बैलजोडीची गावातून ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढली जाते. शिवाय ठिकठिकाणी पूजाही केली जाते. अखेर संध्याकाली बैलांचे आणि गायींचे लग्न लावून पुरण-पोळीचा नैवद्य दाखवला जातो. आता ट्रक्टरची संख्याही वाढत आहे. त्यामुळे काही गावांमध्ये ट्रक्टर पोळाही साजरा होत आहे.
अडचणीत असतानाही उत्साह कायम
यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगाम धोक्यात आहे. पेरणीपासून पावसामदध्ये सातत्य राहिल्याने पिकांची वाढ तर खुंटली आहेच पण याचा थेट उत्पादनावर परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय राज्य सरकारच्या आदेशाने पंचनामेही झाले आहेत पण प्रत्यक्ष मदतीचे काय हा सवाल कायम आहे. गतवर्षी हंगाम अंतिम टप्प्यात असताना परतीच्या पावसाने नुकसान झाले होते. यंदा हंगामाच्या सुरवातीलाच शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशी स्थिती असताना देखील दोन वर्षानंतर यंदा पोळा उत्साहात साजरा झाला आहे.